टोलविरोधी ठराव घेणार : सरपंच संघटना उच्च न्यायालयात जाणारंसावरखेड : नांदगांवपेठनजीकच्या टोल नाक्याला मोर्शी-वरुड भागासह इतरही भागातील वाहतूकदारांचा विरोध होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक दुकानदार, धान्यासह शेतमाल, अन्य साहित्याची वाहतूक खासगी भाडोत्री वाहनाने किंवा मालकीच्या वाहनाने करतात. टोल नाक्यावर त्यांना कर भरावा लागतो. हा कर त्यांना न परवडणारा असल्याने वाहनधारकांसह शेतकरीवर्ग, व्यावसायिकांचा विरोध आहे. हा टोल नाकाच रद्द करावा यासाठी सरपंच संघटना पुढे येत आहे. मोर्शी-वरुड नांदगाव पेठ, परिसरातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेद्वारे चर्चा करुन टोलविरोधी ठराव करण्याचे आवाहन सरपंच संघटनेने केले आहे.या टोलनाक्याशी मोर्शी-वरुड, नांदगाव पेठ परिसरातील वाहतूकदार शेतकरी यांचा काहीही संबंध येत नाही. केवळ आठ कि.मी. अंतरावरील मालाची वाहतूक होत असली तरी त्यांना नाहक भुर्दंड भरावा लागतो. हा भुर्दंड विनाकारण भरावा लागत आहे. मोर्शी-वरुड-अमरावती या मार्गावरील दळणवळणाचा नेहमीच्या बाजारपेठच्या संबंधाने काहीच घेणे-देणे नाही. लांब पल्ल्याच्या अंतराच्या मानाने कमी अंतरावरील कर वसूल केला जात आहे. टोल नाक्याची उभारणी चुकीच्या जागी करण्यात आली, अशी वाहतूकदारांसह, व्यावसायिक, शेतकऱ्यांची ओरड आहे. शेतकरी शेतमालाचे उत्पादन करतो. मुख्य विक्रीसाठी बाजारपेठ अमरावती शहर येते. मालांच्या वाहतुकीकरिता लहान-मोठी वाहने भाड्याने करावी लागतात. तसेच ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांनासुध्दा टोल नाक्यावर कर वसुली भरावी लागत असल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशाला एकप्रकारे कात्री लागत आहे. एकंदरीत सर्वांनाच याचा फटका बसत असल्याने टोल विरोधी प्रतिक्रिया लोकामध्ये उमटत आहे. नाईलाजास्तव टोल कर द्यावा लागत असल्यामुळे लोकांनी टोलला प्रचंड विरोध सुरु केला आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड पडत आहे. याविरोधात सरपंच संघटनेने लढा उभारण्याचे ठरविले आहे. ग्रामसभेला सर्वाधिक अधिकार असल्याने टोल विषयावर चर्चा करुन तसे ठराव शासनाला पाठवावे. या ठरावाच्या प्रतीद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय सरपंच संघटनेने घेतला आहे. त्यादृष्टीने संघटनेच्या सदस्यांना सूचना करुन तशी माहिती देण्यात येत आहे. ठरावांच्या प्रती तालुकाध्यक्षांकडे माहितीकरिता द्यावी, असे आवाहन सरपंच संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील डहाके यांनी केले आहे. (वार्ताहर)
ंनांदगावपेठ टोलनाक्याला व्यावसायिकांचा विरोध
By admin | Published: June 15, 2015 12:16 AM