कर वसुली; संकुलातील गाळेधारकांवर येणार जप्ती
By admin | Published: June 15, 2015 12:12 AM2015-06-15T00:12:01+5:302015-06-15T00:12:01+5:30
महापालिका प्रशासनाने साकारलेल्या २७ संकुलांवर थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले आहेत.
नोटीस बजावली : आठ दिवसांचा कालावधी, लाखो रुपये थकीत
अमरावती : महापालिका प्रशासनाने साकारलेल्या २७ संकुलांवर थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले आहेत. नोटीस बजावल्यानंतर आठ दिवसांत रक्कम न भरल्यास या दुकानांवर जप्तीची कारवाई करून ते ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना म्हणून मालमत्ता कर, एलबीटी, एडीटीपी, बाजार व परवाना विभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका संकुलातील गाळेधारकांवर लाखो रुपये कर थकीत आहेत. करवसुलीसाठी यापूर्वी फार प्रयत्न झाले नाहीत. परिणामी गाळेधारकांकडे लाखो रुपये करापोटी थकीत आहेत. वसुलीसाठी आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बाजार व परवाना विभागाचे अधीक्षक गजानन साठे यांनी कृती आराखडा तयार केला आहे. एकूण २७ संकुलातील थकीत करधारकांची यादी तयार करुन त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कर भरण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. यात बीओटी तत्त्वावरील पाच संकुलाचा समावेश आहे.
संकुलातील गाळेधारकांना नोटीस बजावून थकीत कराची रक्कम भरण्याचे निर्देशित केले आहे. त्याकरिता आठ दिवसांचा अवधी दिला आहे. अन्यथा दुकानांना टाळे लावून जप्तीची कारवाई केली जाईल.
- गजानन साठे,
अधीक्षक, बाजार व परवाना विभाग महापालिका.