शिक्षक समायोजन, बदल्यांना स्थगिती
By admin | Published: June 14, 2016 12:02 AM2016-06-14T00:02:01+5:302016-06-14T00:02:01+5:30
जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे समायोजन व बदली प्रक्रियेला अखेर स्थगिती मिळाली आहे.
आदेश धडकले : श्रीकांत देशपांडेंचा पाठपुरावा
अमरावती : जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे समायोजन व बदली प्रक्रियेला अखेर स्थगिती मिळाली आहे.
१३ जून रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अवर सचिव पी.एस. कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. सुधारित संचमान्यता पूर्ण होईपर्यंत समायोजन आणि बदली प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी ग्रामविकासमंत्र्याकडे केली होती. त्यानुषंगाने स्थगितीचे आदेश धडकले आहेत. जिल्हा परिषदेकडून मागील दोन दिवसांपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली जात होती. स्थगितीच्या आदेशाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग तोंडघशी पडला आहे.
संचमान्यता व विषयनिहाय पदनिश्चितीमध्ये बदल झाल्याने राज्यातील अनेक शाळांमधील संचमान्यता त्रुटीपूर्ण आहे. जोपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक संचमान्यता अंतिम होत नाही. तोपर्यत समायोजनाची प्रक्रिया थांबवावी व जिल्हा आणि तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती आ. श्रीकांत देशपांडे यांनी ६ जून रोजी ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांना पाठविलेल्या पत्रातून केली होती. त्यानुसार याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत बदली प्रक्रियेस व निर्गमित केलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे काढलेल्या आदेशाची प्रत विभागीय आयुक्तांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने राबविलेली बदली प्रक्रिया पुन्हा अडचणीत आली आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग तोंडघशी पडला आहे.