अमरावती - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, माजीमंत्री बच्चू कडू यांनी यापूर्वी आपली नाराजी जाहीरही केली होती. मात्र, सरकारने राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागास मंजुरी दिल्याने कडूंची नाराजी दूर झाल्याचे दिसून येते. त्यातच, त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आळस काढत असलेल्या राजाचं राज्य टिकत नाही, असे कडू यांनी म्हटले.
बच्चू कडू माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांगासाठी मंत्रालय झाले, याचा आनंद आहे. यानिमित्ताने त्यांचे खूप अभिनंदन करतो. शेतकऱ्यांसाठी, अपंग बांधवांसाठी लढणारे नेते आहेत. उद्धव ठाकरेंचे त्यांच्यावर आणि त्यांचेही उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. ते ठाकरेंनाच साथ देतील, असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र, आता कडू यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं आहे.
मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेले, वेळातच भेटायचं असं होता कामा नये. एक तर राजा व्हायचंच नाही झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राजाचं राज्य टिकत नाही, हे आपण दाखवून दिलं, असे आमदार बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले. जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगलं खातं मागत होते, सगळ्या गोष्टींनी वजनदार खातं मागण्याची रेस सुरू होती. पण, मी राज्यातील पहिला माणूस होतो की मी दिव्यांग मंत्रालय मागितलं, अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली. मात्र, कडू यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केल्यामुळे आता त्यांची नाराजी दूर झाल्याचीही चर्चा होत आहे.