लोकमत न्यूज नेटवर्कवनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : चौऱ्यांशी वर्षांच्या उपवरासाठी त्याच्या कुटुंबीयांनी अकोट (जि. अकोला) येथील ६५ वर्षीय वधू शोधून धूमधडाक्यात त्यांचे लग्न लावून दिले. विशेष असे की, या लग्नात खुद्द नवरदेवाने वन्हाड्यांसोबत आनंदाने ठेका धरला. या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत पसरली आहे. रहिमापूर चिंचोली येथील विठ्ठल खंडारे यांचे हे अनोखे लग्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे. सर्वसंमतीने झालेल्या या विवाहाने मानवी जीवनातील स्त्रीचे अढळ स्थानदेखील अधोरेखित केले आहे.
विठ्ठल खंडारे यांची पत्नी हयात नाही. त्यांना जीवनसंगिनीची आस होती तसा प्रयत्नही त्यांनी केला होता. पण, वयोमानापरत्वे स्वबळावर त्यांना ते शक्य झाले नव्हते तेव्हा त्यांनी आपल्या मनातील खंत आपल्या निकटच्या नातेवाइकांना बोलून दाखविली. त्याची तीव्रता समजून घेत आप्त-स्वकीयांनीदेखील संमती दिली. आणि वधू संशोधन सफल होऊन अल्पभूधारक शेतकरी असलेले विठ्ठल खंडारे यांना तिसऱ्या पत्नीच्या रूपात रखुमाई भेटली.
मुलाने दिली संमती विठ्ठल खंडारे यांची पत्नी तीन ते चार वर्षापूर्वी बुद्धवासी झाल्या. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या विवाहाचे मनोगत काही आप्त व मुलाजवळ बोलून दाखवले. कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला तेव्हा लग्नाचा असफल प्रयत्नदेखील त्यांच्याकडून झाला होता. अखेर वडिलांचा हट्ट पुरवित मुलगा व सुनेने होकार दिला आणि अकोट येथील ६५ वर्षीय इंदूबाई दाभाडे यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. बौद्ध पद्धतीने विवाहविधी पार पडले.
सर्वजण सहभागीरहिमापूर ठाण्याच्या पुढ्यातच झालेल्या या विवाहाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. अनेक मान्यवरदेखील आपल्या परिवारासह या सोहळ्याला उपस्थित होते. विठ्ठल खंडारे यांच्यासह त्यांच्या गोतवळ्याने मोठ्या आनंदाने संगीतावर ठेका धरला होता.
विठ्ठलरावांचा गोतावळाविठ्ठल खंडारे यांना एकूण पाच मुले व एक मुलगी आहे. या सर्वांचे लग्न झाले आहेत. १० ते १२ नातवंडे या कुटुंबात आहेत. त्या सर्वांनी मिळून विवाह सोहळा पार पाडला. सर्वजण खुश होते.