अमरावती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीची घोषणा कागदाेपत्रीच असून, यात केवळ राजकीय श्रेय घेण्यात आले आहे. आता १५ दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचे शासनादेश निर्गमित झाले नाही, तर पालकमंत्री, खासदार, आमदारांना घेराव करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा बसपाने दिला आहे. त्याच्या निषेधार्थ लोकप्रतिनिधींचे पुतळे आगीच्या भक्ष्यस्थानी जातील, असे जिल्हाध्यक्ष सुदाम बोरकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.
सिंधुदुर्ग, अलिबाग, नाशिक, उस्मानाबाद, सातारा येथे नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा होऊन शासनादेश जारी झाला आणि येथे अधिष्ठाताची नियुक्तीदेखील करण्यात आली. मात्र, यात एकमात्र अमरावती अपवाद असल्याचा आरोप बोरकर यांनी केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा यांच्यासह आमदारांनी अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मिती होईल, असे जाहीर आश्वासन दिले हाेते. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीसुद्धा अमरावतीत मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी निधी पडू देणार नाही, असे जाहीर केले होते. ही घोषणाही हवेत विरली, असा आरोप बसपाने केला आहे. अमरावतीकरांसाठी आराेग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीचा विषय राजकीय श्रेयवादामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे १५ दिवसांत याविषयी ठोस निर्णय न झाल्यास पालकमंत्री, खासदार, आमदरांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा सुदाम बोरकर यांनी दिला आहे. पत्रपरिषदेला प्रवीण गाढवे, जयदेव पाटील, किरण शहारे, सूरज भगत, वसंत धंदर आदी उपस्थित होते.