चालान करण्याचे अखेर 'त्यांचे' धाडस झालेच नाही
By admin | Published: February 6, 2017 12:15 AM2017-02-06T00:15:39+5:302017-02-06T00:15:39+5:30
कुण्या सामान्य नागरिकाने वाहतूक नियम मोडला तर गुंडांप्रमाणे धावून त्याच्या वाहनाची चक्क चावी काढून घेणारे ...
नियम तोडण्यासाठी अंबर दिवा ? : अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई कशी करणार, वाहतूक शाखेचा सवाल
अमरावती : कुण्या सामान्य नागरिकाने वाहतूक नियम मोडला तर गुंडांप्रमाणे धावून त्याच्या वाहनाची चक्क चावी काढून घेणारे वाहतूक पोलीस आणि अधिकारी राजरोसपणे नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर कसे हतबल आणि लाचार होतात, याचा प्रत्यय मोर्शी मार्गावर विभागीय क्रीडा संकुलासमोर रविवारी आला.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया विभागीय क्रीडा संकुलच्या सभागृहात ६ व ७ फेबु्रवारी रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व अन्य कर्मचारी बैठकीनिमित्त रविवारी क्रीडा संकुल येथे दाखल झाले होते. क्रीडा संकुल व विधी महाविद्यालय या दोन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. मात्र, तरीसुद्धा बहुतांश शासकीय अधिकाऱ्यांची वाहने रविवारी क्रीडा संकुलासमोरील मुख्य मार्गावरच पार्क करण्यात आली होती. सकाळी ११ वाजतापासून ही वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळबंली होती. शासकीय वाहने असल्यामुळे त्यांना हटकणार कोण, असा पेच निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांची वाहने 'राँंग साईड'ने आणणे आणि भर रस्त्यावर पार्क करणे हा सिलसिला सुरू झाला. रस्ता तुंबला. किरकोळ अपघात घडू लागले. बाचाबाची होऊ लागली. लोक तक्रारी घेऊन 'लोकमत'कार्यालयात येऊ लागले. लोकमत कार्यालयातून वाहतूक शाखेला यासंबंधाने माहिती देण्यात आली. बराच वेळ कुणीच फिरकले नाही. मुद्याचे गांभीर्य कळावे, यासाठी वाहतूक शाखेचे एसीपी पी.डी.डोंगरदिवे, निरीक्षक अर्जुन ठोसरे आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. तरीही बराच वेळ सूत्रे हलली नाहीत. वारंवार फोन केल्यावर पोलीस व्हॅन क्रीडा संकुलानजीक पोहोचली. शासकीय अधिकाऱ्यांची वाहने बघून त्यांचे अवसान गळाले. आम्ही कारवाई करू शकणार नसल्याचे येताक्षणीच त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित वाहनचालकांना विनवणी करून त्यांनी वाहन इतरत्र हलविण्यास सांगितले. योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून त्यांनी काढता पाय घेतला.
त्यानंतर काही वेळाने वाहतूक शाखेतील उपविनिरीक्षक पावेल बेले हे अधिकारी क्रीडा संकुलासमोर पोहोचले. त्यांनीही स्थितीचा आढावा घेतला. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करण्याचे धाडस या अधिकाऱ्याचेही झाले नाही. हतबलता दर्शवून ते आल्यापावलीच माघारी फिरले.
प्रथम श्रेणी, दंडाधिकार बहाल असलेल्या अधिकाऱ्यांच्या अशा बेशिस्त वर्तणुकीतून सामान्यजनांनी आणि तरुणांनी काय बोध घ्यावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)
रविवारी वाहतूक शाखेला सुटी
आठवडाभर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणारे बहुतांश वाहतूक अधिकारी व कर्मचारी हे रविवारी सुटीवर असल्याचे आढळून आले. क्रीडा संकुलासमोरील मार्गावर काही वाहने रस्त्यावर उभी असल्याची माहिती देण्यासाठी लोकमतने सर्वप्रथम सहायक आयुक्त पी.डी.डोंगरदिवे यांच्या मोबाईलवर दुपारी १२ वाजता संपर्क केला. त्यांनी मी सुटीवर असल्याचे सांगून संब्ांंधित अधिकाऱ्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र, बराच वेळ वाहतूक शाखेतून कुणीही पोहोचले नाही. त्यानंतर दुपारी १२.२० वाजता पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मोबाईलवर सपर्क केला असता त्यांनीही मी बाहेर गावी असल्याचे सांगून लवकरच पोलीस पाठवित असल्याचे आश्वासन दिले. मात्र, कुणीही आले नाही. १२.२४ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. १२.४१ वाजता दंगा नियंत्रक वाहन असे नमूद असलेली लॉरी (क्रमांक एमएच २७ ए-९५८१) क्रीडा संकुलासमोर पोहचली. त्यांनी काही चालकांना वाहन काढण्याची विनंती केली नि ते निघून गेले.