‘सेरो सर्व्हे’ची तिसऱ्यांदा हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:02+5:302021-06-16T04:16:02+5:30
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना व संभाव्य नियोजन करण्यासाठी ‘सेरो’ सर्व्हे होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सध्या ९५ हजारांवर ...
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना व संभाव्य नियोजन करण्यासाठी ‘सेरो’ सर्व्हे होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सध्या ९५ हजारांवर नागरिकांना कोरोना होऊन गेलेला आहे. शासनाद्वारे तिसऱ्या टप्प्यात ६० गावांत असे सर्वेक्षण करण्यात येत असताना, जिल्ह्यातील गावांचा त्यात समावेश नसल्याची माहिती आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे सर्वेक्षण जिल्ह्यात रखडल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली व फेब्रुवारी ते मार्च महिन्यात दुसरी लाट आली. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर होती. यामध्ये ७० हजार ४६९ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले व १०४३ संक्रमितांचा मृत्यू झाला. तसेही जिल्ह्यात ९५ हजार संक्रमितांची नोंद झालेली आहे. म्हणजेच जिल्ह्यात दर तीस नागरिकांमागे एकाला कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात किती नागरिकांच्या शरीरात अँटिबाॅडी तयार झालेल्या आहेत, हे आगामी उपाययोजनांसाठी महत्त्वाचे ठरते.
नागपूर, वर्धा व अकोला जिल्ह्यात अशा प्रकारचे सर्वेक्षण यापूर्वी झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्ह्याची रुग्णसंख्या जास्त असताना, जिल्ह्याचा समावेश तिसऱ्याही सर्व्हेमध्ये नाही. त्यामुळे संभाव्य उपायोजना कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च जोखीम असलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचारी, कामगार, कंटेन्मेंट झोनमधील व्यक्ती यापूर्वी संक्रमित झाल्या होत्या काय, याची माहिती रॅन्डम पद्धतीने केलेल्या रक्तचाचणीद्वारे माहीत पडते व त्यावरून उपाययोजना केल्या जातात. यासाठी आयसीएमआर (इंडीयन कौन्सिल आॅफ मेडीकल िरिसर्च) द्वारे हे सर्वेक्षण केले जाते.
बॉक्स
असा केला जातो ‘सेरो सर्व्हे’
ही एक प्रकारची सेरोलॉजी टेस्ट आहे. यामध्ये रॅन्डम पद्धतीने नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात व त्यामधून सेल्स व सिरम वेगळे काढले जाते. यात अँटिबॉडी असल्यास त्या सिरममध्ये सापडतात. कोरोना व्हायरसविरोधात आवश्यक अँटिबॉडी तयार आहे किंवा नाही, याची तपासणी याद्वारे केली जाते. यामधील आयजीजी अँटिबॉडी शरीरात चार ते सहा महिन्यांपर्यंत टिकते व मेमरी सेल्स म्हणून काम करते.
बॉक्स
‘सेरो सर्व्हे’चे महत्त्व काय?
दुसऱ्या लाटेमध्ये अनेक नागरिकांना कोरोना होऊन गेला व त्यांना याविषयी काही लक्षण आढळली नाहीत. त्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या. अशाप्रकारे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती तयार झाल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होतो. हे शोधण्यासाठी सर्व्हे करण्यात येतो.
बॉक्स
तिसऱ्या लाटेपूर्वी सर्वेक्षण महत्त्वाचे
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे शासन-प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यापूर्वी काही भागात हर्ड इम्युनिटी तयार झाली काय, हे पाहण्यासाठी ‘सेरो सर्व्हे’ झाल्यास आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाला राबविता येणार आहेत. यावेळच्या सर्वेक्षणात सहा वर्षांवरील मुलांचा समावेश करण्यात आला, तर यापूर्वी दहा वर्षांवरील मुलांचा समावेश करण्यात आलेला होता.
कोट
जिल्ह्यात ‘सेरो सर्व्हे’बाबत अद्याप कुठल्याही सूचना नाहीत. आयसीएमआरद्वारे हा सर्व्हे करण्यात येतो. हर्ड इम्युनिटी व व्हॅक्सिनेशन याद्वारे आगामी उपाययोजना राबविताना अशा प्रकारच्या सर्वेक्षणाची मदत होते.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी