तेरा कोटी वृक्ष लागवडीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:02 PM2018-07-15T23:02:35+5:302018-07-15T23:03:01+5:30
शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पाळा-सालबर्डी मार्गात चक्क रस्त्याशेजारीच रोप लावण्याचा प्रताप संबंधित यंत्रणेने चालविला आहे. त्यामुळे भविष्यात ही वृक्ष मोठी झाल्यास ती तोडावीच लागेल, ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित केली. याप्रकरणी पाळा येथील माजी उपसरपंच नरेंद्र जिचकार यांनी माहिती देऊनही वृक्ष लागवडीचे सोपस्कार पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पाळा-सालबर्डी मार्गात चक्क रस्त्याशेजारीच रोप लावण्याचा प्रताप संबंधित यंत्रणेने चालविला आहे. त्यामुळे भविष्यात ही वृक्ष मोठी झाल्यास ती तोडावीच लागेल, ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित केली. याप्रकरणी पाळा येथील माजी उपसरपंच नरेंद्र जिचकार यांनी माहिती देऊनही वृक्ष लागवडीचे सोपस्कार पार पडले.
मोर्शी-वरूड रस्त्यावरून पाळा मार्गाने साधारणत: दोन किलोमीटर पर्यंत वृक्षलागवड करण्यात आली. या मार्गाचे दापोरीपर्यंत रूंदीकरण प्रस्तावित असून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कामाची सुरूवात होणार आहे. अशाच प्रकारची लागवड जि. प. बांधकाम विभागामार्फत रूंदीकरण होत असलेल्या पाळा-धानोरा रस्त्यावरही करण्यात आली आहे. नियमानुसार रस्त्यापासून तीन ते चार मिटरवर वृक्षलागवड अपेक्षित आहे. असे असताना मोर्शी-वरूड रस्त्यापासून पाळा जाताना दोन किलोमीटरपर्यंत ८ ते ८ फुटावर खड्डे करून वृक्षलागवड करण्यात आली. ही रोपटे रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीने भरलेल्या ड्रमच्या आत तर आहेच. त्याशिवाय मार्गाचे रूंदीकरण होणार म्हणून वनविभाग व बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून वृक्षकटाईचे वृक्षांची नोंद घेतली. त्या वृक्षाच्या आत आहे, हे विशेष.
याबाबत पाळा येथील माजी उपसरपंच तथा कृ. उ. बा. समिती संचालक नरेंद्र जिचकार यांनी शाखा अभियंता सा. बां. उपविभाग मोर्शी यांना सुरूवातीला मोबाईलद्वारे अवगत करूनही ही वृक्षलागवड करण्यात आली.
शासनाने गतवर्षी ४ कोटी वृक्षलागवड केली. यात किती रोपांचे संवर्धन झालेत? हा जनतेमध्ये चर्चेचा विषय असताना यावर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचा धुमधडाका सुरू आहे. एकीकडे रस्ता रूंदीकरणात बेसुमार वृक्षकटाई करण्यात आली. आता रस्ते रूंदीकरणात सीमेतच वृक्षलागवड होत असताना शासनाच्या संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार जनतेच्या पैश्याचा अपव्यय होत असल्याचा आक्षेप नरेंद्र जिचकार यांनी नोंदविला आहे.
टार्गेट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांची लगबग
१३ कोटी वृक्षलागवडीत तालुक्याला मिळालेले टार्गेट पूर्ण करताना संबंधित शासकीय यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहे. शेतकरी बांधावर वृक्षलागवड करू देत नाही. तर, यंत्रणेला झाडेही लावून दाखवायची आहे. अश्यावेळी शासनाला काय साध्य करायचे हा प्रश्न जनतेला पडलेला आहे.
पाहणी करून वृक्षलागवड योग्य ठिकाणी केली जाईल. लवकरच दुरुस्ती करून नव्याने लागवड करू.
- डी.एस. मांगे,
उपविभागीय अभियंता,सा.बां.वि.