व-हाडात तीन हजारांवर गावे तहानली!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 05:39 PM2017-12-22T17:39:34+5:302017-12-22T17:41:08+5:30
विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साइड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे.
- गजानन मोहोड
अमरावती - विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साइड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे. याविषयी विभागीय आयुक्त कार्यालयाने ५,५२९ उपाययोजना प्रस्तावित केल्या. यावर ७९ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
यंदा पावसाळ्यात ७७७.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ५८१ मिमी पडला. या चार महिन्यात केवळ ३६ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी ही दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणीटंचाईची स्थिती जिल्हा प्रशासनाला विशद केली. मात्र, सर्वच जिल्हा परिषदांद्वारा हा गंभीर विषय दुर्लक्षित करण्यात आला. त्यामुळेच पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यांना विलंब झाला. विभागीय आयुक्तांनी याविषयी संबंधितांचे कान उपटल्यानंतर तब्बल महिनाभर उशिराने आराखडा तयार करण्यात आला. त्याचा एकत्रित कृती आराखडा गुरुवारी तयार करण्यात आला.
विभागात जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान १,९१५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी २६५३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ३४ कोटी ४५ लाख ७६ हजारांचा निधी खर्च होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत १,३११ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. याचा सामना करण्यास १,६४१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ११ कोटी ५४ लाख ४८ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये २६६ गावांतील ४३७ विहिरी खोल करून गाळ काढण्यात येणार आहे. यावर २.४३ कोटी खर्च होतील. २,२८० गावांमध्ये २५१२ खासगी विहिरींच्या अधिग्रहणावर १३.२३ कोटी, ५०३ गावांमध्ये ५२१ टँकरद्वारा पाणीपुरवठ्यावर १८.५८ कोटी, ५३१ गावांमध्ये नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीवर १९.५२ कोटी, ७९ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती, १,००७ गावांमध्ये १,१७१ नवीन विंधन विहिरींवर १०.७० कोटी, तर २९७ गावांमध्ये २३७ तात्पुरत्या नळ योजना तयार करण्यासाठी १५.३१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.
टंचाईग्रस्त गावे, उपाययोजना व निधी
अमरावती जिल्ह्यात १४२८ गावांसाठी १७४५ उपाययोजनांवर १७.९९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अकोला जिल्ह्यात ५३४ गावांतील १०८४ उपायोजनांवर २६.८५ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ७९७ गावांतील १२१९ उपाययोजनांवर १८.९४ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६७० गावांतील ९०३ उपाययोजनांवर १०.७९ कोटी व वाशिम जिल्ह्यात ५१० गावांसाठी ५७८ उपाययोजनांवर ४.४९ कोटींचा निधी खर्च होणार आहे. विभागातील जलप्रकल्पांमध्येदेखील सरासरी ४२ टक्केच साठा आहे. अकोला जिल्ह्यात ४१ खासगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे.