अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना विविध ठिकाणांहून अटक केली. जिशान ऊर्फ जिशू वल्द सय्यद रिझवान रिझवी (२०), शहीद अली गुलाम अली (२८ दोन्ही रा. कामठी, नागपूर) व तौफीक हुसैन जाफर हुसैन (१८ रा. पापानगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जिशान व शहीद अली यांनी कोतवाली हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली असून, तौफीक हुसैनने गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एलआयसी कॉलनीतील चेनस्चॅचिंगच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू आहे. आरोपींकडून लुटमारीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिशान उर्फ जिशू वल्द सय्यद रिझवान रिझवी (२०) व शहीद अली गुलाम अली (२८ दोन्ही रा. कामठी, नागपूर) या दोघांना नागपुरातून अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपींनी काही महिन्यांपूर्वी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील नमुना गल्ली क्रमांक ६ येथे रहिवासी रत्नप्रभा शंकरराव जोग (७४ रा. मुधोळकर पेठ) यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या घटनेत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हाचा गुन्हे शाखेतील पोलिसांनी समांतर तपास करून आरोपींना अटक केली.
बॉक्स
एकाला भुसावळवरून अटक
१५ नोव्हेंबर २०२० रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एलआयसी कॉलनीत जोसत्ना शुध्दोधन वानखडे (४६) यांच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीवर आलेल्या दोन इसमांनी हिसकावून नेले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरु करून, आरोपी तौफीक हुसेन जाफर हुसैनला भुसावळवरून अटक केली. त्याने सदर गुन्हा एका साथीदारासह केल्याची कबुली दिली. आरोपी तौफीकला १२ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला १६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, निवृत्ती काकड यांच्या पथकाने नागपुरातून आरोपींना अटक केली आहे. तर पोलीस हवालदार राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर, विशाल वाकपांजर, मोहम्मद सुलतान, चालक गजानन सातंगे यांच्या पथकाने भुसावळवरून आरोपीला अटक केली.