परतवाडा/ अंजनगाव सुर्जी : गावागावांत फिरून भोळ्या नागरिकांना इन्कम टॅक्स ऑफिसकडून कर्ज मिळवून देण्याचे आमीष देऊन फसवणूक करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील तिघांना तीन वर्षांचा कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
अचलपूर न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक ३ एस. टी. सहारे यांच्या न्यायालयाने शनिवारी हा निर्णय दिला. हे फसवणूक प्रकरण ११ वर्षे चालले. योगेश सुरेश गोतमारे व सुरेश कृष्णराव गोतमारे (रा काठीपुरा, अंजनगाव सुर्जी तसेच शिंदी बुद्रुक येथील मो. अफसर मो. सादिक असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. गावातील शंभरपेक्षा अधिक लोकांकडून ५० हजार रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केली होती. या भामट्यांनी पॅनकार्डचे दोनशे रुपये व इन्कम टॅक्स रिटर्नचे २,५०० असे एकूण २७०० रुपये प्रत्येकाकडून फसवणूक करून लुटले होते. पॅनकार्ड दिल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, त्यांना कर्ज मिळाले नाही. अंजनगाव येथे गोतमारे याच्या घरी अनेकदा चकरा मारल्या. आमचे पैसे परत द्या, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यांचे पैसे या गोतमारेने वापस केले नाही. दरम्यान, पथ्रोट पोलिसांत सुनील उत्तमराव रोडे यांच्यासह ३१ जणांनी मिळून १८ जून २०१० रोजी फिर्याद दिली. त्यावरून भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश व सुरेश गोतमारे यांना त्यांच्या काठीपुरा येथील निवासस्थानी जाऊन अटक केली. मोहम्मद अफसर पसार झाला होता. तत्कालीन ठाणेदार हिवाळे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अशोक पवार यांनी या प्रकरणाचा तपास करून अचलपूर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यात अनेक साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील चक्रधर हाडोळे यांनी युक्तिवाद केला. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर या प्रकरणात वरील तिन्ही आरोपींना दोषी ठरवून तिघांनाही तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आरोपी पक्षातर्फे अॅड. खोजरे यांनी काम पाहिले.