अमरावती : महापालिकेच्या राजकारणात एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचे वारे घोंघावत असताना बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन सदस्यीय प्रभागपद्धतीला मंजुरी देण्यात आल्याने राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. प्रशासनाला मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या स्वतंत्र आदेशाची प्रतीक्षा आहे. कॅबिनेटच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे संकेत आहेत.
अमरावती महापालिकेची यापूर्वीची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झालेली होती. या वेळी ऑगस्ट महिन्यात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक सदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी प्रभागरचनेचे नियोजन सुरू असताना बुधवारच्या कॅबिनेटच्या निर्णयामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. महापालिका प्रशासनाद्वारा पाच सदस्यीय समितीद्वारा प्रभागरचनेचे प्रारूप करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निर्णयाचे कायद्यात रूपांतर होईल व त्यानंतर याबाबतचे स्वतंत्र आदेश आयोगाद्वारा जारी होणार असल्याची माहिती आहे.
यापूर्वी सन २००३ मध्ये महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने झालेली होती. त्यानंतर आता याच पद्धतीने निवडणूक होणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांद्वारा बदलत्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केलेली आहे. महापालिकेची मुदत फेब्रुवारी २०२२ संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी किमान चार महिने म्हणजेच दिवाळीदरम्यान निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांना सुरुवात होण्याचे संकेत आहेत.
बॉक्स
२२ ते २४ हजार मतांचा राहणार एक प्रभाग
महापालिकेची प्रभागरचना सन २०११ मधील जनगणनेनुसार होणार आहे. त्या वेळी महापालिका क्षेत्रात ६,४७,०५७ एवढी लोकसंख्या होती. त्यानुसार या वेळी ८७ सदस्य म्हणजेच २२ ते २४ हजार मतांचा एक प्रभाग राहणार आहे. प्रभागांची संख्या पूर्वीप्रमाणेच २२ राहण्याची शक्यता आहे. याअगोदरच्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका पार पडल्या होत्या.
बॉक्स
असे आहे पक्षीय बलाबल
महापालिकेच्या सभागृहात सद्य:स्थितीत भाजप व सहयोगी सदस्य ४९, काँग्रेस १५, एमआयएम १०, शिवसेना ०७, बसपा ०५ व अपक्ष ०१ अशी पक्षीय सदस्यसंख्या आहे. एकूण ८७ सदस्य व पाच स्वीकृत सदस्य आहेत.
कोट
तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ही काँग्रेससाठी पोषक आहे. याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे बहुमत येणार आहे. अशा पद्धतीमध्ये अपक्षांना स्कोप राहत नाही.
बबलू शेखावत
विरोधी पक्षनेता
कोट
बहुसदस्यीत प्रभाग पद्धतीचा भाजप पुरस्कर्ता आहे. या पद्धतीने झालेल्या यापूर्वीच्या निवडणुकीत भाजप बहुसंख्येने विजयी झालेला आहे. प्रत्येक प्रभागातील संघटनाद्वारे या वेळीही आम्ही सत्ता स्थापन करू
तुषार भारतीय
गटनेता, भाजप