अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत दोन, तर सिटी कोतवाली ठाणे हद्दीत एक अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून अवैध दारुसह दोन लाखांचा मुद्देमाल शनिवारी जप्त करण्यात आला. फ्रेजरपुरा हद्दीतील प्रशांतनगरात पहिली कारवाई करण्यात आली. आरोपी सतीश विठ्ठलराव श्रीवास (५१) याच्या ताब्यातून ७० हजारांची दुचाकी, १३,४४०/ रुपयाची दारू असा एकूण ८३,४४० रुपयांचा मुद्देमाल केला.
दस्तुरनगरात केलेल्या कारवाईत आरोपी रोहित ऊर्फ नांदो विजय भोंगाडे (२७, रा. बेनोडा) व सागर यादव (२५, रा. बेनोडा) याच्या ताब्यातून एक लाखाची दुचाकी व ६ हजारांची दारू असा १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सिटी कोतवाली ठाअयांतर्गत प्रतीक प्रमोद श्रीवास (३०) याच्या ताब्यातून ७० हजारांची दुचाकी, ५,७६० रुपयांची दारू असा ७५,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गांधी चौक ते राजकमल मार्गावर करण्यात आली. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने एपीआय पंकज चक्रे, सतीश इंगळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.