चिखलदऱ्याच्या शासकीय व्हीव्हीआयपी विश्रामगृहात आले वाघोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:31 AM2019-04-15T11:31:57+5:302019-04-15T11:35:03+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री ११ वाजता अचानक भिंतीवरून उडी घेत वाघोबाने दर्शन दिले.
नरेंद्र जावरे
अमरावती : डोळ्यापुढे अचानक वाघ दिसताच बापरे! म्हणत अंगावर शहारे येतात. मात्र विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री ११ वाजता अचानक भिंतीवरून उडी घेत वाघोबाने दर्शन दिले. चौकीदाराला वाघ दिसताच त्याने घाबरून स्वत:ला एका खोलीत डांबून घेतले. दहा मिनिटांनंतर वाघोबा गेले आणि त्याचा जीव भांड्यात पडला.
चिखलदरा येथे विविध शासकीय विभागाचे विश्रामगृह आहेत. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह व्हीव्हीआयपी असून येथे राज्यपाल, मुख्यमंत्री व महत्त्वाच्या व्यक्तींना आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो. शनिवारी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे विश्रामगृह परिसरात रोजंदारी चौकीदार किशोर सावलकर कामात मग्न असताना त्याच्यापुढील आवार भिंतीवरून वाघोबाने उडी मारली. कशाचा तरी आवाज आल्याने त्याने त्या दिशेने पाहताना दुरूनच पट्टेदार वाघ दृष्टीस पडले. घाबरून त्याने तेथून खोलीकडे पळ काढला. याची माहिती त्याने तत्काळ खानसामा मोबीन आणि शेख मोहसीन यांना दिली. त्यापूर्वीच वाघोबाने तेथून धूम ठोकली.
अस्वलानंतर बिबट, वाघोबाचे दर्शन
चिखलदरा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलातील हिंस्त्र प्राणी गावाकडे कूच करीत आहेत. शनिवारी पहाटे चिखलदऱ्याच्या आठवडी बाजारात कामाच्या शोधात आलेल्या आदिवासी इसमावर अस्वलाने हल्ला केला. रात्री ११ वाजता व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृहात वाघोबाने उडी घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.
न्यायाधिशांसाठी होते आरक्षण, वाघोबाला मुकले
रविवारी अचलपूर न्यायालयात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे जवळपास ११ न्यायाधीश येणार असल्यामुळे शनिवारी रात्री याच विश्रामगृहाच्या खोल्यांचे आरक्षण काही न्यायाधिशांसाठी करण्यात आले होते. मात्र कुणीच न आल्याने संपूर्ण परिसर रिकामा होता. जंगल सफारीदरम्यान चिखलदरा पर्यटन स्थळावर वाघ दिसावा, यासाठी पर्यटन मोठ्या प्रमाणात मुक्कामी असतात.
विश्रामगृह परिसरात आवश्यक सुविधा आहेतच. आणखीन सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंत वाढविणे किंवा आवश्यकतेनुसार इतर काही करता येईल.
- चंद्रकांत मेहत्रे,
कार्यकारी अभियंता,
सा. बां. विभाग अचलपूर
विश्रामगृह परिसरालगत सर्व जंगल परिसर आहे. वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे अस्वल वाघ हे आंबा, उंबर ओळखण्याच्या दृष्टीने येतात. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- डी .के. मुनेश्वर,
वनपरिक्षेत्राधिकारी, चिखलदरा