आज चोख बंदोबस्त, ४३६ पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:48 AM2019-05-23T00:48:08+5:302019-05-23T00:48:57+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी बडनेरा रोड स्थित नेमाणी गोदामातील स्ट्राँग रूम व बाहेरील परिसरात एकूण ४३६ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. याशिवाय ग्रामीण भागातील १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्ट्राइकिंग फोर्स तैनात राहणार आहे.
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी बडनेरा रोड स्थित नेमाणी गोदामातील स्ट्राँग रूम व बाहेरील परिसरात एकूण ४३६ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. याशिवाय ग्रामीण भागातील १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्ट्राइकिंग फोर्स तैनात राहणार आहे.
शहर पोलीस विभागाने स्ट्राँग रूमच्या आतील व बाहेरील परिसरात तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात तीन पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात १५ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे एकूण ३२ पोलीस अधिकारी, २७० पोलीस कर्मचारी, ४५ महिला पोलीस, ४ स्ट्राइकिंग फोर्स, सीआरपीएफ व एसआरपीएफ प्लॉटूनमध्ये ७० जवान मतमोजणीच्या बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. याशिवाय स्ट्राँग रूम पूर्वीपासून तैनातीत असणाऱ्या ४० पोलीस तैनात राहणार आहेत. स्ट्राँग रूम परिसरातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बिट मार्शल, सीआर मोबाईल व्हॅन, दामिनी पथक व पोलीस ठाण्यातील पोलीस गस्ती राहणार आहे. तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस सेक्शन, मेटल डिटेक्टर डोअर फ्रेम व हॅन्ड होल्ड मेटल डिटेक्टरद्वारे नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. मतमोजणीवेळी गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकातील १० पोलीस नागरिकांच्या हालचालीवर साध्या वेशात लक्ष ठेवणार आहेत. ग्रामीण हद्दीतही प्रतिबंधित उपाययोजना म्हणून १२ ठिकाणी १२० पोलिसांची स्ट्राइकिंग फोर्स तैनात केली. प्रत्येक चौकात १० पोलीस पहारा देणार आहेत.
राजकीय पक्षांचे कार्यालये, नेत्यांच्या निवासस्थानांना सुरक्षा
विविध राजकीय पक्षांच्या कार्यालये व नेत्यांच्या निवासस्थाला पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ही कार्यालये गाडगेनगर, राजापेठ, नांदगाव पेठ व कोतवाली हद्दीत आहेत.