अमरावती-चंद्रपूर राज्य महामार्गावर वाहने सुसाट, साईडपट्ट्या न भरल्याने जीवघेणा प्रवास
अमोल कोहळे
पोहरा बंदी : चांदूर रेल्वेकडे जाणाऱ्या ३० किलोमीटर लांबीच्या राज्य मार्गाचे प्रशस्त नूतनीकरण करण्यात आले आहे. अमरावती-चांदूर रेल्वेपर्यंतच्या राज्य महामार्ग क्रमांक २४३ च्या दुपदरीकरणाचे काम काही दिवसांपासून दुरुस्ती झाल्यानंतर या वाहनाचा वेग वाढला. या गुळगुळीत रस्त्यामुळे अपघात वाढले असून, वाहनांचा वेग नियंत्रित करण्याची मागणी दुचाकी वाहनचालकांनी केली आहे. या राज्य महामार्गाचे नूतनीकरणात मार्गाच्या दोन्ही बाजूने रस्ता उंच केल्याने अंदाजे आठ फूट खोल दरी आजूबाजूच्या कडेला निर्माण झाली आहे. त्यामुळे भीषण अपघातात प्रचंड वाढ झाली असून, त्यात अनेकांना प्राणांना मुकावे लागत आहे. महामार्गावरून वाहने भरधाव वेगाने धावतात. विशेषत: जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा त्यात अधिक प्रमाणात समावेश आहे. अमरावती-चांदूर रेल्वे या मार्गावर अनेक गावे येतात. या मार्गावरून हजारो विद्यार्थी, कर्मचारी व हातमजुरी करणारे रोज या मार्गावरून दुचाकीने ये-जा करतात. बराचसा मार्ग घाटाचा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मार्गाची रुंदी मोठी असून दोन्ही बाजूला खाली खड्डे आहेत. साईडपट्ट्या भरल्या नसल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गावर भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत प्रचंड वाहतूक असते. महामार्गाचे नुतनीकरण झाल्यापासून या मार्गावर भीषण अपघात वाढले असून अपघातात बळीदेखील गेले आहेत. किरकोळ अपघात सातत्याने होत आहेत. घाटाचा वळण रस्ता असल्याने साईडपट्ट्या भरणे आवश्यक आहे. साईडपट्ट्या न भरणे जिवघेणे ठरू शकते. या मार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. ती अद्यापही कापली नसल्याने वळण घेताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गावरील साईडपट्ट्या भरणे व वाहनाचा वेग नियंत्रणात आणावा, अशी मागणी अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर नियमित दुचाकी वाहनाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.