परदेशात आता ‘ट्रान्सक्रिप्ट’ पाठविणार ई-मेलवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 06:55 PM2020-07-24T18:55:36+5:302020-07-24T18:55:47+5:30
कोरोना इफेक्ट : विद्यापीठांचा पुढाकार, परदेशी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
अमरावती : परदेशात शिक्षण अथवा पारपत्रासाठी (व्हिसा) अनिवार्य असलेले ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र आता ई-मेलवर मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात अर्ज केल्यानंतर परदेशातील संबंधित संस्था, विद्यापीठात ‘ट्रान्सक्रिप्ट’ ई-मेलवर पाठविले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वेळ आणि आर्थिक बचत होणार आहे.
परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र हे अनिवार्य असते. त्याशिवाय परदेशात शिक्षण घेता येत नाही. ‘ट्रान्सस्क्रिप्ट’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी संबंधित विद्यापीठांकडे अर्ज करतात. त्यानंतर हे प्रमाणपत्र परदेशात पोहचण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. हल्ली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विमान सेवा ठप्प असल्याने परदेशात ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र पाठविणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोंदविलेली परदेशातील संस्था, विद्यापीठात हे प्रमाणपत्र ई-मेलवर पाठविले जात आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर ‘ट्रान्सक्रिप्ट’ हे दोन ते तीन दिवसांत ई-मेलद्वारे पाठविले जात आहे. हल्ली ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र हे एकूणच विद्यापीठांतून ई-मेलद्वारे पाठविण्यात येत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कॅनडा येथील वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेससाठी विद्यार्थ्यांकडून ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्राची मागणी होत आहे. २१ मार्च ते २४ जून या कोरोना कालावधीत ४५ विद्यार्थ्यांनी ‘ट्रान्सक्रिप्ट’ची मागणी केली आहे. जुलै महिन्यात ३५ अर्ज विद्यार्थ्यांनी सादर केले आहे.
सीलबंद लिफाफ्यातही दिली जाते ‘ट्रान्सक्रिप्ट’
विद्यापीठातून परदेशात ई-मेलद्वारे पाठविली जाणारे ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र सीलबंद लिफाफ्यातही विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर पाठविले जाते. मात्र, आता ई-मेलद्वारे प्रमाणपत्र पाठविले जात असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी परदेशातील कंपनी, संस्था यांचे ना-हरकत पत्र असल्यास विद्यापीठातून ते थेट त्यांच्याकडेच पाठविले जात होते. याला किमान महिना, दीड महिन्याचा कालावधी लागत होता.
‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र अतिशय गोपनीय राहते. ते सीलबंद पाठविण्याची प्रक्रिया विद्यापीठातून होते. मात्र, हल्ली विमान सेवा बंद असल्याने ते ई-मेलवर पाठविले जात आहे. त्यानंतर ते सीलबंदसुद्धा दिले जात आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ