क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक ठरते नागरिकांना डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:10 AM2021-06-29T04:10:50+5:302021-06-29T04:10:50+5:30
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात . ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून ...
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात . ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून प्रवास सुरु करून सकाळी नियोजित ठिकाणी पोहचतात . याकरिता रेती तस्करांचे विशेष पथक तैनात असून पोलीस महसूल आणि आरटीओला लाजवेल अशी पायलेटिंग करून'' रोड क्लिअर '' च्या सूचना देऊन वाहने पार करतात . मध्यप्रदेश सौंसर परिसरातून ३० ते ३५ तर कधी ४० टनांपर्यंत रेती भरून डंपर आणतात . रात्री ते डंपर मध्यप्रदेश हद्दीत उभी करून पहाटे साडेपाच वाजतापासून रेती तस्करांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुरु होते . वनविभागाच्या करवार नाका पासून सुरु होऊन पुढे आरटीओ चेक पोस्ट पार करून पुसला , वरुड , बेनोडा सुद्धा पार करून ते पुढे जातात . तर काहींनी डंपर वगळता बंद ट्रक मधून रेतीची वाहतूक करून प्रशासनाचीही दिशाभूल केल्या जाते . प्रशासन मात्र मूग गिळून अर्थ पूर्ण सेवा देत असल्याची चर्चा आहे . यामध्ये महसूल सह पोलीस सुद्धा गुंते असल्याचे सांगण्यात येऊन पहिले दर्श आरटीओचे घ्यावे लागत असल्याने परिवहन विभाग सुद्धा झोपलेला असल्याचे सांगण्यात येते . लॉक डाऊन मध्ये सर्व बंद असताना ओव्हरलोड रेती वाहतूक सुरु होती . सौंसर येथून महाराष्ट्रातील वरुड , मोर्शी , अमरावती , चांदूरबाजार , परतवाडा , अकोला पर्यंत येथून ओव्हरलोड रेतीची वाहतूक होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष केल्या जाते. तर महसुली पथक सुद्धा कुचकामी ठरत आहे . अधिकाऱयांच्या वरदहस्ताखाली रेती वाहतूकदाराचे चांगलेच फावत आहे . या रेती तस्करांना अभय कुणाचे हा प्रश्न आहे . रेती तस्कराचे अधिकाऱ्यांसोबत सूत जमवून देणारे दलाल कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे .दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी सुरु असताना आंधळ्या प्रशासनाला अवैध रेती वाहतुकदार दिसणार तरी कधी ? सर्वसामान्यांना त्रास देणारे , कायद्याचे धडे गिरवणारे अधिकारी रेती तस्करांना अभय का देतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे .
* प्रभारी तहसीलदारावर सुरु आहे तहसील कार्यालय !
येथील कार्यरत तहसीलदार किशोर गावंडे ३० मे ला सेवानिवृत्त झाले तेंव्हा पासून तहसीलदाराचा कारभार नायब तहसीलदार सांभाळत आहे . येथे कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावा . तहसील कार्यालय रामभरोशे झाले असून कोविद ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही तर जबाबदार अधिकारीच नसल्याने तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला . यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे .