लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून मेळघाटच्या काही ठरावीक गावांसह मध्य प्रदेशच्या सीमारेषेपलीकडच्या गावांमध्ये भरणाऱ्या बाजारात थाट्यांची धूम सुरू झाली आहे. सोमवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथे थाट्यांचा बाजार भरला होता.मेळघाटात बहुसंख्येने असलेल्या गोंड समाजात थाट्या या शब्दाचा अर्थ होतो गुराखी. वर्षभर गावातील गुरेढोरे जंगलात नेऊन चारणाऱ्या या थाट्यांच्या आनंदपर्वाला दिवाळीतील गोवर्धन पूजेपासून सुरुवात होते. मालकांकडून मिळणाऱ्या हक्काच्या बक्षिसीवर ते जल्लोष करतात. तब्बल आठवडाभर हे गुराखी नाचगाणे म्हणत हा आनंद साजरा करतात. चिखलदरा तालुक्यातील काजलडोह, डोमा, कोयलारी, बगदरी, कोटमी आदी गावांमध्ये गोंड समाजातील थाट्यांची संख्या अधिक आहे. संपूर्ण गावांची गुरे मोजून सकाळी घेऊन जाणे आणि सायंकाळी परत आणणे हीच त्यांची दिनचर्या. या रोजच्या कामातून उसंत त्यांना मिळत नाही. त्यामुळे थाट्या बाजाराची ते वर्षभर वाट पाहतात.
ढोल-बासरीच्या स्वरांनी आसमंत निनादलागोवर्धन पूजेच्या दुसऱ्या दिवशीपासून मेळघाटच्या काही गावांसह मध्य प्रदेशातील गावांमध्ये या थाट्या बाजाराला सुरुवात झाली आहे. सावलमेंढा येथील बाजारात गुराखी म्हणून ओळख असलेल्या गोंड समाजातील थाट्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेत दाखल झाले. बाजाराचे आकर्षणाचे ते केंद्रबिंदू ठरले. लांब तुतारी, तेवढीच लांब बासुरी व ढोलकीवर थाप देत, पायात बांधलेल्या घुंगरांच्या तालबद्ध नादाने त्यांनी आसमंत निनादून टाकला. यानंतर बुधवार-गुरुवारी कुनखेडी, मेळघाटातील चुरणी, काटकुंभ येथे थाट्या बाजार भरणार आहे.
नाचगाणे गात मागतात बक्षीसगावातील ज्या पशुपालकांची गुरे वर्षभर थाट्या चराईसाठी घेऊन जातात, त्यांच्याकडून हक्काने बक्षिसांची रक्कम ते मागतात. आठवडी बाजाराच्या दिवशी दिवसभर जमा केलेली बक्षिसांची रक्कम सायंकाळी एकत्र करून जल्लोष केला जातो. आवडीनुसार खानपान केले जाते. मेळघाटात आदिवासी गोंड समाजाची संख्या काटकुंभ भागात काही गावांमध्ये सर्वाधिक आहे. वर्षातून एकदाच बक्षिसांची मागणी होत असल्याने पशुपालक त्यांना आनंदाने देतात. या थाट्या बाजाराला पाहण्यासाठी ज्या गावातील आठवडी बाजार असेल, त्या पंचक्रोशीतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने हजेरी लावतात, हे विशेष. त्यामुळे नेहमीच्या आठवडी बाजारापेक्षा या दिवसांतील आठवडी बाजार माणसांनी फुललेले दिसतात.
गोंड समाजातील थाट्याची परंपरा असून, वर्षातून एकदा ते आपला आनंदपर्व साजरा करतात. त्यांचा हा सर्वात मोठा सण असतो.- जुगराम सलामे,बगदरी