घरफोडीतील मास्टर मार्इंडने बदलविले बारा मोबाईल
By admin | Published: July 3, 2014 11:19 PM2014-07-03T23:19:01+5:302014-07-03T23:19:01+5:30
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १४ घरफोडींच्या घटनांची कबुली देणाऱ्या टोळीचा मास्टर मार्इंड अमित केने याने चार महिन्यांत महागडे बारा मोबाईल बदलविल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १४ घरफोडींच्या घटनांची कबुली देणाऱ्या टोळीचा मास्टर मार्इंड अमित केने याने चार महिन्यांत महागडे बारा मोबाईल बदलविल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्याने हे मोबाईल हाताळण्यासाठी आतापर्यंत विविध मोबाईल कंपनींचे चार ते पाच सिमकार्ड वापरले. त्यातील ‘विशेष’ संपर्कासाठी असलेले सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.
शहरात घरफोडींच्या घटना वाढत असतांना घरफोडीच्या गुन्ह्यातील मोस्ट वॉन्टेड आरोपी अमित केने याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. त्याने पोलिसांना शहरातील १४ घरफोडींच्या घटनांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ६० हजार रुपयांचा मुद्दे माल हस्तांतरित केला. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून त्याने घरफोडी केल्यानंतर चार महिन्यात विविध १२ मोबाईल बदलविले. या सर्व मोबाईलमध्ये तो एकाच सिम कार्डचा वापर केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. परंतु मोबाईलची संख्या पाहून त्याने साधारण पाच पेक्षा अधिक सिम कार्डचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अमितच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवार (ता. ४) रोजी न्यायालयात हजर करुन पुन्हा पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याची माहीती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.