एकाच घरावर दोनदा कर्ज, एसबीआयचे ३० लाख हडपले
By प्रदीप भाकरे | Published: March 17, 2024 05:35 PM2024-03-17T17:35:39+5:302024-03-17T17:36:33+5:30
स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेमधून ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करवून घेतेवेळी आरोपी महिलेेने अभियंता कॉलनी, नवसारी या भागातील बांधलेले घर बँकेकडे गहाण ठेवले होते.
अमरावती : बनावट कागदपत्रे देऊन येथील जुना कॉटन मार्केट स्थित एसबीआयच्या कृषी विकास शाखेची ३० लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ३१ जुलै २०२० ते १६ मार्च २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. दोन आरोपींनी बँकेला कुठलीही पूर्वकल्पना न देता खोटे दस्तावेज व बनावट कागदपत्र तयार करून ३० लाख रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याची तक्रार क्षेत्रीय प्रबंधक संजोग भागवतकर (४६) यांनी केली. त्याआधारे सिटी कोतवाली पोलिसांनी १६ मार्च रोजी रात्री आरोपी दीपक नारायण ढोरे व एक महिला (दोघेही रा. अमरावती) यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. एकाच घरावर दोनदा कर्जाची उचल करण्यात आली. अर्थात एकच घर दोन बॅंकेकडे गहाण ठेवण्यात आले.
स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेमधून ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करवून घेतेवेळी आरोपी महिलेेने अभियंता कॉलनी, नवसारी या भागातील बांधलेले घर बँकेकडे गहाण ठेवले होते. ते बँकेच्या हक्कात लिहून दिले. त्या घराची कागदपत्रे अमरावती महानगरपालिकेत कर आकारणीसाठी जमा केल्याचे व अन्य कुठल्याही बँकेकडून वा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले नसल्याचे प्रतिज्ञापत्र आरोपींनी बँकेला दिले. मूळ खरेदीसुद्धा एसबीआयकडे जमा केली नाही. मात्र, त्यानंतर आरोपी दीपक ढोरे यानेदेखील सन २०१० मध्ये अन्य एका सहकारी बँकेतून कर्ज घेताना तेच घर त्या बँकेला गहाण ठेवले असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणाची बँकेच्या वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यानंतर दीपक ढोरे व त्या महिलेने एसबीआयच्या कृषी विकास शाखेतून बनावट दस्तावेज देऊन ३० लाख रुपयांचे कर्ज बेकायदा घेतल्याचे लक्षात आले.