बेनोडावासीयांचा निवडणुकीवर अघोषित बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:28 PM2019-04-01T23:28:49+5:302019-04-01T23:29:02+5:30

सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू असताना, बेनोडा आणि परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानादेखील ग्रामीण भागात निवडणुकीच्या घडामोडींना कुठलाही वेग आल्याचे दिसून येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने या निवडणुकीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. कोरडा दुष्काळ हा चर्चेचा एकमेव विषय आहे.

Undeclared boycott on Benodhasian elections | बेनोडावासीयांचा निवडणुकीवर अघोषित बहिष्कार

बेनोडावासीयांचा निवडणुकीवर अघोषित बहिष्कार

Next
ठळक मुद्देकोरडा दुष्काळ : पाणीटंचाईचा मुद्दा प्रभावी

लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा (शहीद) : सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू असताना, बेनोडा आणि परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानादेखील ग्रामीण भागात निवडणुकीच्या घडामोडींना कुठलाही वेग आल्याचे दिसून येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने या निवडणुकीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. कोरडा दुष्काळ हा चर्चेचा एकमेव विषय आहे.
एरवी निवडणुका म्हटल्यावर ग्रामीण भागात पारावरच्या गप्पांना उधाण येते. सत्ताधाऱ्यांनी केलेली विकासकामे आणि चुका यावर मोठा वादविवाद रंगतो. आपापल्या पक्षाची ध्येयधोरणे आणि उमेदवाराचे उजवेपण कार्यकर्ते पोटतिडकीने सांगतात. मतदारांमध्येही निवडणूक आणि अंतिम निकालाबाबत प्रचंड कुतूहल असते.
सर्वदूर आपल्याच उमेदवाराची हवा असल्याचे तुणतुणे कार्यकर्ते जोरात वाजवितात, तर मतदारही कुणाची कुठे हवा आहे, याचा मागोवा आपापल्या परीने घेतो. मात्र, यंदाची लोकसभा निवडणूक या घडामोडींना अपवाद ठरत आहे. निवडणुकीवर कोरडा दुष्काळ वरचढ झाल्याचे दिसून येत आहे.
पाणीटंचाई केंद्रस्थानी
मोर्शी विधानसभा मतदारसंघ अमरावती ऐवजी वर्धेत समाविष्ट असल्याने लोकसभेत आपले स्थान दुय्यम असल्याची नागरिकांची मानसिकता आहे. निवडणुकीला दहा दिवस उरले असताना रिंगणातील उमेदवारांची नावेही ग्रामीण भागात चर्चेला नाहीत.
अद्यापही कुठल्याही उमेदवाराने आपले फ्लेक्स लावलेले नाहीत. यामुळे उमेदवार कोण, हेच जनसामान्यांना माहिती नाही. गावात पिण्यासाठी आणि शिवारात सिंचनासाठी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असल्याने पाणी हा एकमेव विषय ग्रामिणांच्या चिंतेचा आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांवर एरवी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा असते, स्वत: तेच पाण्यासाठी वणवण फिरत असल्याने प्रचार कोण करेल, ही सर्वपक्षीय नेत्यांना लागलेली चिंता आहे.

Web Title: Undeclared boycott on Benodhasian elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.