विद्यापीठाची शुल्कवाढ अखेर रद्द
By admin | Published: June 15, 2015 12:15 AM2015-06-15T00:15:46+5:302015-06-15T00:15:46+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीला विद्यार्थी संघटनानी विरोध दर्शविला.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीला विद्यार्थी संघटनानी विरोध दर्शविला. यामुळे अखेर शुल्कवाढीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी बैठकीत घेतला. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने ३० टक्के शुल्कवाढीचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक भुर्दंड वाढणार होता.
कर्जबाजारी व नापिकीने त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांवरच आर्थिक भुर्दंड वाढल्यास तो पेलणार नव्हता. त्यामुळे शहरातील विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवून आंदोलन पुकारले. युवासेना, एनएसयूआय, अभाविप, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, युवा स्वाभिमान आदी संघटनांनी विद्यापीठावर हल्लाबोल करुन शुल्कवाढीचा तीव्र निषेध केला. विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विद्यापीठात धडक देऊन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढीचा निषेध केला. त्यानंतर कुलगुरु मोहन खेडकर यांच्या दालनात तब्बल तीन तास आंदोलन करुन कुलगुरुंना धारेवर धरले होते. यामध्ये युवासेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल माटोडे, राहुल नावंदे, एनएसयुआयचे अतुल ढेंगळे आदींनी विद्यापीठावर हल्लाबोल करून शुल्कवाढीचा निषेध केला.