विद्यापीठ प्रयाेगशाळेने नमुने तपासणीचा लाखांच्या वर गाठला पल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:15 AM2021-02-25T04:15:02+5:302021-02-25T04:15:02+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोविड-१९ विषाणू प्रयोगशाळेने आतापर्यंत १ लाख १ हजार ८३४ नमुने तपासले असून, त्यापैकी ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोविड-१९ विषाणू प्रयोगशाळेने आतापर्यंत १ लाख १ हजार ८३४ नमुने तपासले असून, त्यापैकी १८ हजार १७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. विद्यापीठ प्रयाेगशाळेमुळे आरोग्य यंत्रणेला कोरोना संसर्गाचे नियोजनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
सुमारे ११ महिन्यांपूर्वी अमरावतीत मुमताज ऑटोवाला नामक कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होत गेली. आता तर एकूणच जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप झाल्याचे चित्र आहे. दरदिवशी कोराेनाग्रस्तांची आकडेवारी नवीन उच्चांक गाठत आहे. ४ मे २०२० रोजी विद्यापीठात कोविड १९ प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. मंगळवारपर्यंत या प्रयाेगशाळेने लाखांवर नमुने तपासणीचा पल्ला गाठला आहे. अमरावतीत प्रयोगशाळा नव्हती त्यावेळी नागपूर, अकोला येथे नमुने तपासणीसाठी पाठविले जात होते. मात्र, नमुन्यांचे अहवाल प्राप्त होण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, विद्यापीठ कोविड १९ प्रयोगशाळेत नमुने तपासणीमुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. एप्रिल २०२० ते २४ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान निरंतरपणे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची संख्या ओसरत असतानासुद्धा विद्यापीठ प्रयोगशाळा सुरूच होती.
दरम्यान, गत १५ दिवसांपासून कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून, मृत्यूसंख्यादेखील वाढली आहे. विद्यापीठ प्रयोगशाळेत हल्ली दरदिवशी एक हजारांपेक्षा जास्त नमुने तपासले जात असल्याची माहिती प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे यांनी दिली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचञया नेतृत्वात या प्रयाेगशाळेत नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे, तंत्रज्ञ नीरज गावंडे, प्रशांत गावंडे, मुकेश बुरंगे, सुधीर शेंडे, नीलू सोनी, प्रज्ञा साऊरकर, पूजा मांडविया, अमृता कळुस्कर, रेशमा धर्माळे, शुभदा माहुते, अर्पणा जाधव, श्रुतिका उभाड, गोपाल मापारी, प्रसाद चांभारे, अक्षय शिंदे यांची चमू कार्यरत आहे.
-----------------------------
प्रयोगशाळेत तीन पाळीत ३० तंत्रज्ञांची चमू कार्यरत
विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत अलीकडे कोरोना नमुने तपासणीची संख्या वाढली आहे. दरदिवशी ९०० ते एक हजारांपेक्षा जास्त नमुने तपासणीसाठी येत आहे. कामांचा प्रचंड ताण वाढत असताना प्रयोगशाळेत तीन शिफ्टमध्ये ३० तंत्रज्ञांची चमू कार्यरत आहे. नमुने तपासणीची कामे वेगाने करण्यात येत आहेत.