विद्यापीठाचा तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:54+5:30
विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पाणी पुढे रोखण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, गतवर्षापासून तलावाच्या भिंतीतून लीकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.
गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा झाला आहे. यंदा पावसाळ्यात ‘ओव्हर फ्लो’ झालेल्या या तलावाला अलीकडे बूड लागल्याने उन्हाळ्यात हिरवळ कशी सुरक्षित ठेवणार, हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. सिंचन विभागाच्या देखरेखीत साकारलेल्या या तलावाची गळती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव आहे.
विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पाणी पुढे रोखण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, गतवर्षापासून तलावाच्या भिंतीतून लीकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. यावर्षी लीकेज आणखी वाढल्यामुळे पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेला हा तलाव त्यानंतर दीड महिन्यांतच कोरडा झाला आहे. त्यामुळे परिसरातील गावे, खेड्यांतील पशूंना पाणी कसे उपलब्ध होईल, ही चिंता आतापासून पशुपालकांना सतावू लागली आहे. तलाव परिसरातील वन्यजिवांनासुद्धा यंदा पाण्यापासून मुकावे लागणार आहे. हिरवळ अशी सर्वदूर ओळख असलेल्या अमरावती विद्यापीठाला यंदा वृक्ष, फुलझाडे, हिरवळ जोपासताना पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल, यात तीळमात्र शंका नाही. विद्यापीठ प्रशासनाने वेळेपूर्वीच भिंतीचे लीकेज दुरुस्ती केले असते, तर तलाव कोरडा झालाच नसता, असा सूर उमटू लागला आहे.
लीकेज रोखण्यात अपयश
सिंचन विभागाचे दुरुस्ती पत्राला उत्तर नाही
तलावाच्या भिंतीतून पाणी लीक होत असल्यामुळे ती दुरुस्त करावी, असे पत्र सिंचन विभागाला विद्यापीठाने पाठविले होते. मात्र, विद्यापीठाच्या या पत्राची सिंचन विभागाने दखल घेतली नाही. परिणामी वर्षभरात तलावाच्या भिंतीतून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले. यंदा जोरदार पावसाने तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतरही अवघ्या दीड महिन्यांत तो कोरडा पडला आहे.
‘रूसा’ अंतर्गत ५० लाखांतून तलाव खोलीकरण
तलाव खोलीकरणाला कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मान्यता प्रदान करून जलसंधारण समिती गठित केली. आता वित्त समितीसमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. यावर्षी उन्हाळ्यात काम युद्धस्तरावर होणार आहे. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत खोलीकरण, भिंतींचे बांधकाम याकरिता ५० लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे.
मॅकेनिक प्रणालीने पाणी अडविणार
तलावातून वाहून जाणारे पाणी विद्यापीठ परिसराच्या बाहेर जाणार नाही, याची दखल नव्या प्रस्तावात घेण्यात आली आहे. कोल्हापुरी पद्धतीने पाणी दुसऱ्या तलावात साठविले जाणार आहे. त्याकरिता भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तलावातील पाणी साठवणुकीकरिता यांत्रिक प्रणालीचा वापर होणार आहे.
तलाव निर्मितीला २५ वर्षे झालीत. भिंतीतून लीकेज असल्याबाबत सिंचन विभागाला कळविले. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मात्र, आता तलावाचे खोलीकरण, भिंत दुरुस्ती, निर्मितीसाठी नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. उन्हाळ्यात ही कामे पूर्णत्वास जातील.
- शशिकांत रोडे
कार्यकारी अभियंता