विद्यापीठात नर, मादी बिबट्यासह बछड्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:55 AM2019-05-23T00:55:11+5:302019-05-23T00:55:55+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नर, मादी बिबट्यासह बछड्याचा वावर रविवारी दिसून आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने पुन्हा अलर्ट जारी केले असून, कुलगुरू बंगल्याच्या समोरील रस्त्यावरून तलाव मार्गाकडे ये-जा करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. महिनाभरापासून विद्यापीठ परिसरात बिबट्याने वास्तव्य चालविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नर, मादी बिबट्यासह बछड्याचा वावर रविवारी दिसून आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने पुन्हा अलर्ट जारी केले असून, कुलगुरू बंगल्याच्या समोरील रस्त्यावरून तलाव मार्गाकडे ये-जा करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. महिनाभरापासून विद्यापीठ परिसरात बिबट्याने वास्तव्य चालविले आहे.
विद्यापीठ परिसरात बिबट असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यानुसार प्रशासनाने आतील भागात ये-जा करताना नागिरकांनी सतर्कता बाळगावी, अशा सूचनांचे फलक दर्शनी भागात लावले आहे. मध्यंतरी बिबट विद्यापीठ परिसरात दिसून आला नाही. मात्र, रविवार १९ मे रोजी दुपारी ४ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता दोन बिबट्यासह बछडा दिसून आले. विद्यापीठ परिसरात ज्या मार्गाने बिबट्याचा संचार आहे, त्या मार्गावर मचान बनविण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी एक बिबट कुलगुरू बंगल्याच्या मागील बाजूला पाणी पिण्यास आले असताना मचानीवरून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी बघितले. मात्र, सुरक्षा रक्षकाने या बिबट्याजवळ वाहन नेताच त्याने नाल्याच्या मार्गाने धूम ठोकली, अशी माहिती सुरक्षा अधिकारी रवींद्र सयाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रविवारी दुपारी ४ वाजता एक बिबट नाल्यात दडून बसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता विद्यापीठ परिसरात नर, मादी बिबट्यासह बछडा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुरक्षा अधिकाऱ्यांनी वनाधिकाºयांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने पोबारा केला होता.
सुरक्षा यंत्रणा पुन्हा अलर्ट : संत्राबाग, कुलगुरू बंगल्याच्या मागील बाजूस नाल्यात आढळले
कुलगुरूंचा सीसीएफसोबत मोबाईलवर संवाद
विद्यापीठ परिसरात बिबट असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेºयात कैद झाले. रविवारी तीन तासांच्या फरकाने दोन बिबट दिसून आल्यामुळे अधिकारी, कर्मचारी, नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्याशी मोबाइलवर संवाद साधला. उपाययोजना तातडीने कराव्यात, असे कुलगुरू चांदेकर म्हणाले.
तृष्णातृप्तीसाठी विद्यापीठात धाव
जंगलात पाणी, भक्ष्य शोधणे कठीण झाले आहे. त्यामुळे महिनाभरापासून वनक्षेत्रात गेलेल्या नर-मादी बिबट्याच्या जोडीने पुन्हा विद्यापीठात धाव घेतली आहे. कुलगुरूंच्या बंगला परिसरात बिबट्याचा संचार असल्याने अप्रिय घडना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्ली बिबट भक्ष्य, पाण्याच्या शोधात असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
विद्यापीठात नाल्याच्या मार्गाने ये-जा करण्याचा बिबट्याचा संचार मार्ग बंद करण्याबाबत पत्र दिले आहे. रविवारी वनकर्मचाºयांनीसुद्धा नाल्यात बिबट बघितला. तीन ट्रॅप कॅमेरे बसविले होते. पुन्हा दोन कॅमेरे वाढविले आहेत.
- कैलास भुंबर, आरएफओ