विद्यार्थ्यांचे कुलसचिवांना साकडे, अंतिम वर्षाचा निकाल फुगला, जागा कमी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यंदा अंतिम वर्षाचा निकाल फुगला आहे. त्यामुळे एम.एस्सी. अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता कमी आणि विद्यार्थी अधिक अशी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या जागा वाढवाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलसचिव तुषार देशमुख यांच्याकडे निवेदनातून केली.
कोरोनाकाळात विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर परीक्षा अखेर सुरळीतपणे पार पाडल्या. किंबहुना अंतिम वर्षाचा निकाल ९५ ते १०० टक्के लागला. त्यामुळे बॅकलॉगचे विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धाव घेणार आहेत. त्याचवेळी नियमित विद्यार्थ्यांना निकाल प्रलंबित असल्याने प्रवेशापासून वंचित राहावे लागेल, अशी भीती आहे. त्यामुळे एम.एस्सी.च्या सर्व शाखांच्या जागा वाढवून द्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. शुभम रंगे, पीयूष ठाकरे, विनीत धर्माळे, नीतेश बनसोड, प्रतीक गजभिये, अंकुश चिंचमलतापुरे, अमरदीप मकेश्वर आदी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.