अनलॉकमध्येही शाळा राहणार ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:00 AM2021-06-14T05:00:00+5:302021-06-14T05:00:38+5:30
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शिक्षकांना कोरोनायोद्ध्यांसाेबत कर्तव्य बजावण्यासाठी काही कामे सोपविण्यात आली होती. कोरोनाकाळात शिक्षकांंनी गाव, खेड्यांमध्ये त्यांना दिलेले कर्तव्य चोखपणे बजावले. मात्र, वर्षभर अध्यापनाचे काम मागे राहिले. यावर्षी जूनपासून शाळा सुरू होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, शाळेची घंटा केव्हा वाजणार, हा प्रश्न गतवर्षाप्रमाणे यंदाही शिक्षकांना अनुत्तरित करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना आला आणि शाळा-महाविद्यालये बंदचा निर्णय शासनाने घेतला. हल्ली कोविड- १९ चे रुग्ण कमी होत असल्याने अनलॉकचा निर्णय घेत, संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने, प्रतिष्ठाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, जून उजाडला असताना शाळा सुरू होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, विद्यार्थी, शिक्षकवृंद कधीपर्यंत ‘लॉक’ राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शिक्षकांना कोरोनायोद्ध्यांसाेबत कर्तव्य बजावण्यासाठी काही कामे सोपविण्यात आली होती. कोरोनाकाळात शिक्षकांंनी गाव, खेड्यांमध्ये त्यांना दिलेले कर्तव्य चोखपणे बजावले. मात्र, वर्षभर अध्यापनाचे काम मागे राहिले. यावर्षी जूनपासून शाळा सुरू होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, शाळेची घंटा केव्हा वाजणार, हा प्रश्न गतवर्षाप्रमाणे यंदाही शिक्षकांना अनुत्तरित करीत आहे.
गतवर्षी फेब्रुवारी, मार्चपासून शाळा बंद आहेत. यादरम्यान शाळांची दुरुस्ती, डागडुजीची कामे प्रलंबित आहे. शाळा सुरू नाही, शिक्षक काय करणार, निकालाची बोंबाबोंब, असे मुद्दे चर्चेत आहेत. जिल्ह्यात पहिली ते दहावीपर्यंत १लाख ८९ हजार १२ मुले, तर २ लाख १२ लाख ४८९ मुलींची पटसंख्या आहे.
४०० शाळांची कामे प्रस्तावित
जिल्हा परिषदेच्या सुमारे ४०० शाळांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर या शाळांतील बांधकाम सन २०२०-२०२१ या वर्षात प्रस्तावित आहेत. काही ठिकाणी किरकोळ दुरुस्ती असल्याची माहिती जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई.झेड. खान यांनी दिली. या किरकोळ दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी दिला असून, ही कामे शाळास्तरावर केली जाणार आहेत.
गुरुजींची शाळा सुरू होणार..?
- १५ महिन्यांपासून ना अध्ययन, ना शाळा सुरू आहे. त्यामुळे शिक्षकही घरी कंटाळून गेले आहेत. ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थी अथवा शिक्षकही समाधानी नाही.
- विद्यार्थी घरीच ‘लॉक’ असल्याने पालकही वैतागून गेले आहेत. मुलांना घरी मोबाईल, टीव्हीचे वेड लागले असल्याने शाळा सुरू व्हाव्यात, अशी पालकांची मागणी आहे.