थंडी आली तरी कोरोनाचे संक्रमण कमीच, श्वसनाचे रोग टाळता आले
अमरावती : मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा थैमान ऑक्टोबरपासून कमी झाला. मात्र, शासन, प्रशासनाने नागरिकांना मास्क वापराची सक्ती केल्यामुळे गत दोन महिन्यात फ्ल्यू, बॅक्टेरीया, अस्थमा अन् बुरशीजन्य आजार राेखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. विशेषत: श्वसनाचे आजार टाळता आले, असे मत ज्येष्ठ मेडिसीनतज्ज्ञ अजय डफळे यांनी व्यक्त केले.
कोविड १९ पासून बचावासाठी शासनाकडून नानाविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मार्च ते सप्टेंबर हे सात महिने कोरोना संसर्ग रोखणे प्रशासनाला आव्हानात्मक ठरले. परंतु, त्यानंतर मास्कचा वापर, नियमितपणे हात धुणे आणि शारीरिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात मास्कचा वापर न करणारे नागरिक, वाहनचालकांना ३०० रुपये दंड आकारण्याची धडक कारवाई केली. त्यामुळे अमरावतीकरांना मास्क वापराची सवय झाली आहे. मास्क वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागल्याने साथरोगाचा फैलाव टाळता आला. ‘नाे मास्क, नो एन्ट्री’ असे शासकीय, प्रशासकीय कार्यालयांत फलक लागल्यानेसुद्धा मास्कचा वापर वाढला आहे.
----------------------
गतवर्षी आणि यावर्षीच्या हिवाळ्याच्या सुरुवातीची आकडेवारी
मागील वर्षीची ओपीडी- २९०८१
यावर्षीची ओपीडी- १८५४२
----------------------------
मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळा
सप्टेंबरमध्ये कोरोनाची वाढती आकडेवारी बघता ऑक्टोबरमध्ये कोरानाचा स्फोट होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली. मात्र, शासन, प्रशासनाने मास्कचा वापर अनिवार्य केल्याने साथीच्या आजाराला आळा बसला. सर्दी, पडसा, खोकल्यासह सारीच्या अनुषंगाने उद्भवणारे आजार रोखण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरली. स्वाईन फ्ल्यू, बॅक्टेरिया व्हायरल फैलाव थांबल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.
-------------------
श्वसनाचे रोग थांबले
मास्क वापराने कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी थंडीत श्वसनाचे होणारे रोग थांबले आहे. यापूर्वी ज्यांना कोरोनाची लागण झाली अशांना बुरशीजन्य होणारे आजार राेखता आले आहे. विशेषत: सर्दी, खोकला, ताप यावर नियंत्रण मिळवता आले. थंडी सुरू होताच श्वसनाचे रोग असलेली रुग्णांची संख्यादेखील रोडावली आहे.
-----------------
कोट
मास्क वापर अनिवार्य करण्यासाठी यंत्रणेला काही कठोर उपाययोजना कराव्या लागल्या आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून कोरोना संसर्गात र्हास झाला आहे. थंडी सुरू झाली असली तरी श्वसन आजाराचे रुग्ण फार कमी आहे. सर्दी, पडसा, ताप यासह स्वाईन फ्ल्यू, बॅक्टेरिया व्हायरल रोखता आले आहे. नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती