लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असून त्यांनी आता तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे मंगळवारी येथे म्हणाले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी पांढरी खानमपूर येथील आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पालघर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी मुलुंड कोर्टात केस दाखल करून खासदार राणा यांनी फ्रॉड केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणांवर भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर आमच्यासाठी आदरणीय असून ते वडिलांसारखे आहे. त्यांच्यामुळेच मी आमदार झालो. काही चुकले असेल त्यांनी कान पकडायला पाहिजे. नवनीत राणा यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार तो मान्य राहील. - रवी राणा, आमदार, बडनेरा.