भाजीपाला, फळे शेतातच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:12 AM2021-05-16T04:12:05+5:302021-05-16T04:12:05+5:30
राजुरा बाजार : लॉकडाऊनमुळे मार्केट बंद असल्याने भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला ...
राजुरा बाजार : लॉकडाऊनमुळे मार्केट बंद असल्याने भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला शेतकरी व विक्रेत्यांनी उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीने जिल्ह्यात व तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंधांमुळे काढणीस आलेला भाजीपाला शेतातच सडू द्यावा लागणार आहे. यातच अत्यावश्यक सेवेत फळे, भाजीपाला, किराणा, धान्य असे अनेक अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने कुलूपबंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल मार्केटमध्ये नेण्यासाठी अडथळा येत आहे. वांगी, टमाटर, भाजीपाला, कांदा हा माल काढणीस आला आहे. नाशवंत असल्याने शेतातच सडू द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. शेतकरी शेतात जात असताना पोलिसांकडून दंडुका पडत आहे.
एकीकडे पीक शेतात सडत असल्याने शेतकरी चिंतेत, तर दुसऱ्या बाजूने पोलिसांचा दंडुका यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
राजुरा, वाडेगाव, काटी, चिंचरगव्हाण, उदापूर, हातुणा, पवनी (संक्राजी) या गावांत भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या कडक निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. शेतातील माल काढण्यासाठी मजूर, वाहनाची गरज असते. काढणीस आलेला माल तसाच सडू द्यावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
कोट
यावर्षी शेतातील विहिरीची पाणीपातळी वाढल्याने रबी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांदा, वांगी, टोमॅटोची लागवड केली. आता सर्व माल विक्रीस आला आहे. पण, मार्केट बंद आहे. निर्बंधांमुळे हा माल विक्रीस कुठे न्यावा?
- पंकज काकडे, भाजीपाला उत्पादक, राजुरा बाजार
कोट २
आठवड्यात मार्केट जर उघडले नाही, तर सहा ट्रॅक्टर कांदा शेतातच सडेल. तो फेकावा लागेल. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
- जितेंद्र बहुरूपी, कांदा उत्पादक, राजुरा बाजार