व्हीआयपी सीम क्रमांकाची बतावणी, ठगबाज यूपीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:27 AM2019-04-08T01:27:37+5:302019-04-08T01:28:14+5:30
व्हीआयपी सीम क्रमांक देण्याची बतावणी करून एका व्यक्तीची ४६ हजारांनी फसवणूक करणाऱ्या तीन ठगबाजांना सायबर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाजीयाबाद जिल्ह्यातून शुक्रवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : व्हीआयपी सीम क्रमांक देण्याची बतावणी करून एका व्यक्तीची ४६ हजारांनी फसवणूक करणाऱ्या तीन ठगबाजांना सायबर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाजीयाबाद जिल्ह्यातून शुक्रवारी अटक केली. समीर अन्सारी फुरकान अन्सार (२३), मोहम्मद सलमान मोहम्मद युसुफ (२३) व मोहम्मद उमर कमरूद्दीन (२७ सर्व रा. अलवी नगर, लोनी, गाजीयाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रानुसार, मनीष तांबी यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर व एसएमएस पोर्टलवर एक संदेश प्राप्त झाला. त्यात व्हीआयपी मोबाईल क्रमांक खरेदीसाठी सिम कार्ड क्रमांक व त्याच्या किमतीची यादी आली होती. त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मनीष यांनी संपर्क करून व्हीआयपी क्रमांक खरेदी करण्याबाबत विचारणा केली. संबंधित मोबाईलधारकाने सांगितल्याप्रमाणे मनीष तांबी यांनी पेटीएम वॉलेट क्रमांकावर चार सिम कार्ड खरेदीसाठी ४६ हजार रुपये पाठविले. सिम कार्ड सुरू होण्यास सात दिवस लागेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, सीम सुरू न झाल्याने मनीष यांनी चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळाले. या घटनेची तक्रार मनीष यांनी सायबर पोलिसांकडे केली. त्यानुसार जिल्हा ग्रामीण हद्दीतील सायबर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकधारक आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ४२०, सहकलम ६६ (डी) आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला.