कौंडण्यपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; भाविकांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 07:06 PM2019-11-13T19:06:56+5:302019-11-13T19:09:28+5:30
कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला सोहळा
अमरावती: विदर्भाची पौराणिक राजधानी असलेले अमरावती जिल्ह्यातील माता रुक्मिणीचे माहेर तसेच प्राचीन परंपरा व संस्कृती लाभलेले श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानात कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला महाराष्ट्र शासनाच्यावतीने तिवस्याचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी शासकीय महापूजा केली.
दहीहंडीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जातो. त्यानुसार १३ नोव्हेंबरला सकाळी ७.३० वाजता शासनाचे प्रतिनिधी म्हणून तिवस्याचे तहसीलदार वैभव फरतारे व मुंबई येथील संत अच्युत महाराज संस्थानचे अध्यक्ष सुधीर दिवे यांनी महापूजा करून दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांना प्रारंभ करून दिला. येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसात येथे मोठी यात्रा भरते.
कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला पंढरपूरचा विठ्ठल कौंडण्यपुरात अडीच दिवसांसाठी मुक्कामी असतो, अशी आख्यायिका आहे. यामुळे विदर्भातील वारकरी संप्रदायाचे भाविक, नागरिक, शेतकरी, शेतमजूर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी रुक्मिणीच्या या माहेरी येतात.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून १९ पालख्यांसमवेत आलेल्या वारकऱ्यांनी प्रतिपदेच्या सकाळीच वर्धा नदीच्या घाटांवर स्नान करून पहाटे ५ वाजतापासून मंदिरात दर्शनासाठी येण्यास सुरुवात केली. सकाळी ७.३० वाजता मंदिरात महापूजेला सुरुवात झाली. यात विठ्ठल-रुक्मिणीचा अभिषेक केला गेला. त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करून शासनाच्यावतीने तिवसा तहसीलदार वैभव फरतारे तसेच संत अच्युत महाराज संस्थानचे अध्यक्ष सुधीर दिवे व त्यांच्या पत्नी धनश्री दिवे यांनी विठ्ठलाची महापूजा केली.
रुक्मिणी मातेला ओटी भरली. या शासकीय पूजेला तिवस्याचे प्रभारी तहसीलदार दत्ता पंधरे व गटविकास अधिकारी विनोद मेंढे सपत्नीक उपस्थित होते. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, सचिव सदानंद साधू, उपाध्यक्ष वसंत दाहे, विश्वस्त अतुल ठाकरे, मंडळ अधिकारी नंदकिशोर मधापुरे व प्रशांत जायदे, तलाठी अडमाची, माजी सरपंच देवराव खडसे, श्रीराम केवदे हेदेखील उपस्थित होते.