पोटनिवडणुकीकडे मतदारांनी फिरविली पाठ
By Admin | Published: April 18, 2016 12:10 AM2016-04-18T00:10:05+5:302016-04-18T00:11:34+5:30
नगराध्यक्ष अंजली अग्रवाल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वॉर्ड क्र. ४ मधील नगरसेवकपदाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडली.
सरासरी ३५ टक्के मतदान : उन्हाचा फटका
चांदूररेल्वे : नगराध्यक्ष अंजली अग्रवाल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वॉर्ड क्र. ४ मधील नगरसेवकपदाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडली. ४४ अंशांवर पोहोचलेला उन्हाचा पारा आणि इतर नगरसेवकांच्या अकार्यक्षमतेमुळे मतदारांनी या पोटनिवडणुकीकडे पाठ फिरविली असल्याचे ३५ टक्के झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे.
मतदानासाठी एकूण पाच मतदान बुथ तयार करण्यात आली होती. नगरपरिषदेची सुभाष शाळा, नेहरु शाळा व जिजामाता कन्या अशा तीन शाळेतील मतदान केंद्रात मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी साडेसातपासून मतदानाला स्ुरुवात झाली होती. परंतु ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षाला टाळता आली असती व शासनाचा खर्च वाचवता आला असता. या मतावरुन अनेक मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. सहा महिन्यानंतर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तेव्हा सहा महिन्यांसाठी कशाला पोटनिवडणूक अशी चर्चा मतदारांमध्ये दिसून आली.
गेल्या दोन महिन्याभरापासून विविध भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपांनी चांदूररेल्वे नगरपरिषद गाजत आहे. सत्तेतील अनेक नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे त्या विरोधात झालेल्या उपोषण-आंदोलनानेही नगरपरिषद गाजली. अशा वातावरणात आलेल्या पोटनिवडणुकीवर प्रभाग ४ च्या मतदारांनी एकप्रकारे बहिष्कारच टाकल्याची चर्चा परिसरात ऐकू आली तर तिसऱ्या आघाडीच्या आवाहनानंतर अनेक मतदारांनी ‘नोटा’ या बटनेचा वापर करीत तीनही उमेदवार पसंत नसल्याचे सांगितल्याचाही अंदाज आहे.
मतदान काढण्यासाठी गेलेल्या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना मतदारांनी आज चांगलेच फटकारले. (तालुका प्रतिनिधी)