लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज शहरी आणि ग्रामीण मिळून शंभर ते सव्वाशे रुग्ण निघत आहेत. यात अस्तित्वात असलेली आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. आपल्याला बेड मिळेल, या आशेने कोविड रुग्णालयासह कोविड सेंटरवर ते गर्दी करीत आहेत. बेडकरिता त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रतीक्षेनंतरही बेड न मिळाल्यामुळे नाईलाजाने त्यांना घरी परतावे लागत आहे. घरी परतलेल्या या रुग्णांंसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शहरी भागासह ग्रामीण भागात मुक्त संचार सुरू आहे. कोरोनाचा प्रसार करण्यास ते कारणीभूत ठरत आहेत. अचलपूर तालुक्यातील परतवाडा शहरातील डेडिकेटेड कोविड रुगणालयात ७० बेड, आंबेडकर वसतिगृहात ८० बेड आणि धारणी रोडवरील बुरडघाट येथील कोविड सेंटरमध्ये १०० बेड आहेत. पण, वाढत्या रुग्णांपुढे ही व्यवस्था कमी पडत आहे. यात कोरोना रुग्ण बेड न मिळाल्यामुळे भटकत आहेत. औषधोपचारापासून वंचित राहत आहेत.दरम्यान, कोविड रुग्णालयासह कोविड सेंटरला औषधांचा तुटवडा जाणवत आहे. आवश्यक त्या औषधी रुग्णांना मिळत नाहीत. दिल्या जात नाहीत, तर औषधांचा पुरवठा मागणीनुसार केला जात नाही. यामुळे औषध कमी पडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी हयगय त्यांच्या जिवावर उठणारे ठरू शकते.
तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सुन्नअचलपूर नगर परिषदेच्या यंत्रणेकडून शहरातील संक्रमितांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नुसता बोलाचाच भात नि बोलाचीच कढी अन् प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला नगर परिषदेची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. कोविड रुग्णालयात किंवा कोविड सेंटरला रुग्ण पाठवताना त्या ठिकाणी बेड उपलब्ध आहेत किंवा नाही, याची खातरजमा संबंधित यंत्रणेकडून केली जात नाही. ही यंत्रणा सरळ कोरोना रुग्णांना चिठ्ठी देऊन केंद्रावर किंवा रुग्णालयात पाठविते. कशी तरी व्यवस्था करून ते रुग्ण ती चिठ्ठी घेऊन त्या रुग्णालयात किंवा कोविड सेंटरला पोहोचतात. पण, तेथे त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत.
पालिकेचे क्वारंटाईन सेंटर केव्हा?नगरपालिकेने या कोरोना महामारीत अद्याप आपले क्वारंटाईन सेंटर सुरू केलेले नाहीत. कोरोनाच्या पहिल्या टर्ममध्ये अचलपूर नगर परिषदेकडून तीन क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. आज हे क्वारंटाईन सेंटर नव्याने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातच अचलपूर तालुका वैद्यकीय अधिकारी दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झाल्या. कोरोना लसींचे दोन डोज झाल्यानंतर त्या कोरोना संक्रमित आल्या आहेत. यात त्या २३ मेपर्यंत सुटीवर असल्याची सूत्राची माहिती आहे.