विदर्भावर जलसंकट, साठा २५ टक्क्यांवर, ७० गावांत टँकरवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:03 PM2018-02-19T23:03:35+5:302018-02-19T23:04:02+5:30
फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात विदर्भातील जलसाठा सरासरी २५ टक्क्यांवर स्थिरावल्याने जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
अमरावती : फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात विदर्भातील जलसाठा सरासरी २५ टक्क्यांवर स्थिरावल्याने जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. नागपूर व अमरावती वगळता राज्यातील अन्य चार प्रदेशांतील जलप्रकल्पांची पातळी समाधानकारक आहे. दरम्यान, अमरावती विभागातील ७० गावांमध्ये ५६ टँकर्स ग्रामस्थांची तहान भागवित आहेत.
अमरावती प्रदेशातील ४४३ जलप्रकल्पांमध्ये १७ फेब्रुवारीअखेर केवळ २७.८७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर नागपूर प्रदेशातील ३८५ प्रकल्पांमध्ये २३.९३ टक्के अर्थात ११२५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. कोकण प्रदेशातील १७५ प्रकल्पांमध्ये ६५.५५ टक्के, नाशिक प्रदेशातील ५६१ प्रकल्पांमध्ये ५७.४८ टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ६६.५२, तर मराठवाडा प्रदेशातील ९५७ प्रकल्पांमध्ये ४७.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अन्य चारही विभागामध्ये सरासरी ६० ते ६२ टक्के जलसाठ्याच्या तुलनेत अमरावतीत २७.८७, तर नागपूरमधील २३.९३ टक्के जलसाठा वैदर्भीयांच्या चिंतेत भर पाडणारा आहे. राज्यातील ३२४६ प्रकल्पांमध्ये ५२.८३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
अमरावती प्रदेशातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये २६.२८ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.५५ टक्के, ४०९ लघू प्रकल्पांमध्ये २५.३९ टक्के जलसाठा आहे, तर नागपूर प्रदेशातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.११, ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ३०.३४ व ३२६ लघू प्रकल्पांमध्ये २८.६३ टक्के जलसाठा असल्याने यावर्षी विदर्भाला भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीच्या तुलनेत नागपूर प्रदेशातील जलपातळी अधिक घसरली असताना, तेथे टँकरवारी सुरू झालेली नाही.
राज्यात २४९ गाव-वाड्या तहानल्या
राज्यातील २४५ गावे व चार वाड्यांमध्ये ५४ शासकीय व १६८ खासगी अशा एकूण २२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागातील ६९ गावांमध्ये ३८ टँकर, पुणे विभागातील एका गावात एक टँकर, औरंगाबाद विभागातील १०८ गाववाड्यांत १२७, तर अमरावती विभागातील ७० गावांमध्ये ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केली जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालय व पाणीपुरवठा कार्यालयाने दिली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९० गाव-वाड्यांमध्ये एकूण ६८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.