जलवाहिनी फुटली, तीन दिवस पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:30 PM2018-06-04T22:30:26+5:302018-06-04T22:30:44+5:30
वादळी पावसाने वाहिन्यांवर वृक्ष कोसळून वीजपुरवठा खंंडित झाल्याने सिंभोरा धरणावरील पाणीपुरवठा करणारे पंप बंद पडले. सोमवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर धरणावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरविले गेले. मात्र, अचानक माहुली ते नांदगाव पेठ दरम्यान जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटरची गळती सुरु झाली. त्यामुळे पंप बंद करून पाइप लाइन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वादळी पावसाने वाहिन्यांवर वृक्ष कोसळून वीजपुरवठा खंंडित झाल्याने सिंभोरा धरणावरील पाणीपुरवठा करणारे पंप बंद पडले. सोमवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर धरणावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरविले गेले. मात्र, अचानक माहुली ते नांदगाव पेठ दरम्यान जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटरची गळती सुरु झाली. त्यामुळे पंप बंद करून पाइप लाइन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी आता पुढील तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
उन्हाळ्याच्या अखेरीस अमरावतीकरांची पाण्याची मागणी वाढली असताना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाने सुरळीत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही अमरावतीकरांना दिली होती. तरीसुद्धा अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना अमरावतीकरांना करावाच लागत आहे. एकीकडे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली, तर दुसरीकडे जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. रविवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. त्यावेळी आलेल्या वादळी वाºयात सिंभोराजवळील विद्युत तारेवर वृक्ष कोसळून वीजपुरवठा खंडीत झाला. विजपुरवठ्यावर चालणारे सिंभोरा धरणातील पंप बंद पडल्यामुळे पाणीपुरवठाही बंद झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आल्याने सोमवारी दुपारी १२.३० वाजता वीजपुरवठा पूर्वरत झाला. मात्र, अडीच तासांतच मजीप्राची माहुली जहागीर ते नांदगावपेठ दरम्यानची मुख्य पाइप लाइन फुटून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. कालबाह्य पीएससी पाइप लाइन फुटल्याने पुन्हा सिंभोरातील पंप बंद करण्यात आले. तीन मीटर खोल असणाºया पाइप लाइन दुरुस्तीचे काम मजीप्राने सुरू केले असून, दिवसरात्र काम करून नवीन लोखंडी पाइप लाइन टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या दुरुस्तीसाठी तीन दिवस लागणार असल्याने हा कालावधी अमरावतीकरांसाठी पाणीसंकट निर्माण करणाराच राहणार आहे.
पॅरलल फीडरची सोय नाही
मजीप्राकडे ९० हजारांवर ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना सिंभोरा धरणातून पाणी उचलणाºया पंपांना पॅरलल फीडरची सोय नाही. मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता अशा वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत विचार केला नाही, हे विशेष.
बदलविले जातील पाईप
मजीप्राची मुख्य पाणीपुरवठा पाइप लाइन पीएससीची असून, ती कालबाह्य झाली आहे. तीन मीटर खोलीवरील या लाइनच्या दुरुस्तीत तीन-चार दिवस जातील. त्याऐवजी लोखंडी पाइप टाकण्याचे काम केले जाईल, अशी माहिती शाखा अभियंता अजय कर्नेवार यांनी दिली.