पाझर तलावातून आधी पाणीचोरी, नंतर परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:49 PM2018-02-26T21:49:51+5:302018-02-26T21:49:51+5:30
मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी पाझर तलावातून आधी पाण्याची चोरी नंतर रीतसर परवानगी, असा अफलातून कारभार वनविभागाने चालविल्याचे दिसून येते.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी पाझर तलावातून आधी पाण्याची चोरी नंतर रीतसर परवानगी, असा अफलातून कारभार वनविभागाने चालविल्याचे दिसून येते. नर्सरीत पाणी वापराबाबत रोहयो वनक्षेत्राधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेकडे अधिकृत परवानगी मागण्याबाबतचे आदेश उपवनसंरक्षकांनी दिले आहे.
‘लोकमत’ने २२ फेब्रुवारी रोजी ‘रोपवाटिकेत पाणी चोरी’ या आशयाखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग खळवळून जागे झाला. दरम्यान प्रभारी सीईओ के.एम.अहमद यांनी रोपवाटिकेत पाणी चोरीप्रकरणी जलसंधारण अधिकाºयांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या मालकी हक्काचे असलेल्या दिवाणखेड येथील पाझर तलावातून विनापरवानगीने पाणी उपसा होत असल्याबाबत कनिष्ठ अभियंत्याकडे वनविभागाला नोटीस देणे, विनापरवानगीने पाणी उपसा केल्याप्रकरणी कार्यवाही करणे आदी कर्तव्य बजावण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने पाणी चोरीबाबत जाब विचारताच वनविभागाची भंबेरी उडाली. अखेर उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी याप्रकरणी अधिक वाद न वाढविता नर्सरीतील रोपांचे संगोपन, संवर्धनासाठी जिल्हा परिषदेतून पाणी वापराबाबतची अधिकृत परवानगी मागण्याबाबतचे निर्देश रोहयो वनक्षेत्राधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार पाणी वापराबाबत परवानगी मिळण्यासाठी रोहयो वनक्षेत्राधिकाºयांनी पत्रव्यवहार चालविल्याची माहिती आहे. वनविभाग देखील चोरी करू शकतो, हे पाझर तलावातून पाणी उपसा प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
पाणी चोरीप्रकरणी वनविभाग बॅकफूटवर
दिवाणखेड येथील पाझर तलाव जि.प.च्या अखत्यारित येते. या तलावातून पाण्याची चोरी करू न रोपे जगविण्याची शक्कल रोहयो वनक्षेत्राधिकाऱ्यांनी लढविली. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या सभागृहात गाजणार ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. तत्पूर्वी पाझर तलावातून पाणी वापराची परवानगी मिळविण्यासाठी वनविभागाने आता शर्थीचे प्रयत्न चालविले आहे. एकूणच याप्रकरणी वनविभाग बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.
दिवाणखेड येथील पाझर तलावातून पाणी वापराबाबत जिल्हा परिषदेकडून अधिकृत परवानगी मिळविण्यासाठी आरएफओंना आदेश दिले आहेत. त्यानुसार रोहयो वनक्षेत्राधिकाºयांनी पत्रव्यवहार चालविला असून, लवकरच नर्सरीत पाणी वापराची परवानगी मिळेल.
- हेमंत मीना,
उपवनसंरक्षक, अमरावती