अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आली जलसमृद्धी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 07:02 PM2020-10-29T19:02:14+5:302020-10-29T19:06:07+5:30
Amravati News water नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या पाण्याचा मोठा लाभ मिळणार आहे.
नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हाय-वे या समृद्धी महामार्गाचे काम जानेवारी २०१९ पासून जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर अशा तीन तालुक्यात युद्धस्तरावर सुरू झालेले आहे. समृद्ध महामार्गाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या माती मुरुमासोबतच प्रशासनाच्या मृद व जलसंधारण विभागाशी सांगड घालण्यात आलेली आहे.
महामार्ग बांधकामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत माती, मुरूम, दगड या साहित्याचा वापर एनसीसी कंपनी लिमिटेडने जलसंधारणाला २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरुवात केली. धामणगाव तालुक्यातील १२ नाला खोलीकरण व दोन साठवण तलाव, चांदूर तालुक्यातील पाच नाला खोलीकरण व एक साठवण तलाव तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील २१ नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून, त्यातील माती-मुरुम मार्गावर उपयोगात येत आहे. सात साठवण तलावांची निर्मिती झाली.
तीनही तालुक्यांत वाढली पाण्याची पातळी
धामणगाव तालुक्यातील ६१.४०० मीटर, चांदुर रेल्वे तालुक्यात ९ हजार मीटर व नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ३० हजार ८१० मीटर अशी एकूण ९१ हजार २१० मीटर लांबीचे नाला खोलीकरण करण्यात आले. त्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नाला खोलीकरणाचा लाभ मिळाला. लगतच्या शेतीतील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाला खोलीकरनामुळे साठवण तलावाची क्षमता ९६८.०० टीएमसीने वाढली आहे. या जलसंधारणाच्या कामांमधून ३ लाख ४१ हजार २५० ब्रास माती मुरूम उपलब्ध झाल्याने याचा वापर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी झाला आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या बाजूला नाला खोलीकरण व साठवण तलाव तयार करण्यात आले आहे. यात साठवणूक झालेल्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. विशेषत: या भागातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.
- गजानन पळसकर,
कार्यकारी अभियंता, अमरावती
समृद्धी महामार्गाच्या कामाला गती आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या वेळेप्रमाणे हा मार्ग पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे या कामावर काही स्थानिक मजुरांनाही प्राधान्य देण्यात आलेले आहे.
- नीरजकुमार,
जनरल मॅनेजर, एनसीसी कंपनी