पाटी-पेन्सील धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:40+5:302021-09-05T04:17:40+5:30
राजकमल, ईर्विन, श्याम चौकात बालकांचा ठिय्या, आई-वडिलांचेही भीक्षा मागण्यासाठी पाठबळ अमरावती : एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी ...
राजकमल, ईर्विन, श्याम चौकात बालकांचा ठिय्या, आई-वडिलांचेही भीक्षा मागण्यासाठी पाठबळ
अमरावती : एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी राज्य शासनाची ‘टॅग लाईन’ आहे. मात्र, ज्या हातात पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा आला. हे विदारक चित्र शहरातील राजकमल, तहसील, पंचवटी, श्याम व इर्विन चौकात सिग्नलवर पाहावयास मिळत आहे. या निरागस बालकांना भीक मागण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडूनही बळ मिळत असल्याचे वास्तव आहे.
औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. परंतु, अमरावतीत लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे वास्तव आहे. वाहतूक सिग्नलवर मुुले भीक मागतात आणि आई-वडील पैसे गोळा करताना दिसतात. शासनाकडून विशिष्ट समुदायासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, योजनादेखील आहेत. मात्र, निरक्षरता, अज्ञान, व्यसन, दारिद्र्य, कूप्रथामुळे विशिष्ट समुदायातील ही मुले भीक मागतात आणि भावी जीवनात ते वाममार्गाला लागत असल्याचे अनेक उदाहरण आहेत.
------------------
भीक मागते त्याच भागात वास्तव्य
शहरातील राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौकात भीक मागणारी मुले रात्री त्याच भागात आई-वडिलांसह वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. उड्डाण पुलाखालील जागा ही भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहे. पुलाखालीच ‘किचन’ थाटले जाते. रात्रीला उघड्यावर विश्रांती आणि दिवसा सिग्नलवर भीक मागणे, हा त्यांचा शिरस्ता आहे.
-----------------
कोरोनाकाळात मुंबईहून आलेले कुटुंब
कोरोनाकाळात मुंबईहून अनेक कुटुंब अमरावतीत परतले. मात्र, दीड वर्षापासून ते अमरावतीतच भीक मागून उपजिविका भागविणे ही नित्याचीच बाब झाली आहे. भीक मागणारे बालके जिल्ह्यातील विविध भागातील आहेत. मात्र, ना शिक्षण, ना सामाजिक भान, अशीच त्यांची स्थिती आहे.
-------------------
भीक मागणारी काही मुले पोलीस सहकार्य व बालकल्याण समितीच्या आदेशाने ताब्यात घेऊन बालगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, या मुलांच्या आई-वडिलांनी मोठा गोंधळ घातला. पोलिसांना त्रस्त केले. अखेर त्या मुलांना सोडून देण्यात आले.
- अमित कपूर, समन्वयक, चाईल्ड लाईन