पथ्रोट : सन २०१४ पासून दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना माफ करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, त्याकरिता जाचक अटी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले, तर काहींच्या कर्जाची परिस्थिती जैसे थे राहिली. त्यांचे कर्जावरील व्याजाचा आकडा फुगत असल्यामुळे ते शेतकरी हवालदिल झाले आहेत.
महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी देण्याची घोषणा केली. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत २ लाखांपेक्षा कमी कर्ज असणाऱ्यांना ती कर्जमाफी मिळाली. परंतु ज्या शेतकऱ्यांवर दोन लाखांच्या वर कर्ज आहे. त्यांनी दोन लाखांच्या वरची उर्वरित रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो, असे त्यात नमूद होते. त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी दोन लाखांच्या वरच्या उर्वरित रकमेचा भरणा केल्यानंतरही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. सहकारी बँक, सहकारी सोसायट्यांकडे शेतकऱ्यांनी चकरा मारून अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्हाला शासनातर्फे आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा तिढा कायम आहे. बँका, सहकारी सोसायट्या व शेतकरी संभ्रमात असून व्याजदराचा आकडा फुगत चाललेला आहे.
कोट
आसमानी संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. बँक कर्ज निल करण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. त्यामुळे शासनाने २०१४ पासूनची कर्जमाफीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
- जयंत हरणे, शेतकरी पथ्रोट
कोट
दोन लाखांवरील कर्जाची उर्वरित रक्कम शेतकरी भरत आहेत. भरल्यावरही कर्जमाफीबाबत अध्यादेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जुन्या खातेदार शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प आहेत.
- गजानन बोडखे, सचिव, पथ्रोट
---------