अमरावती/ संदीप मानकर
शहरातील वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वाॅच ठेवण्याकरिता ट्रॅफिक सिग्नलसह ११२ स्पॉटचा सर्वे करून ते स्पॉट निश्चित करण्यात आला. त्याकरिता पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आमसभेत करण्यात आली. मात्र, सदर प्रस्ताव अद्याप सीसीटीव्ही सहनियंत्रण समितीसमोर गेल्याच नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रश्न लांबणीवर पडला आहे. कॅमेऱ्याची फाईल शासकीय लालफितशाहीत अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर आरती सिंह यांनी शहराच्या वाहतुकीचा आढावा घेतला. वाहतूक कोंडी कमी करणे, वाहतूक नियम तोडून उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ‘वॉच‘ ठेवण्याकरिता ट्रॅफिक सिग्नल तसेच शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या मुद्द्यावर सर्व विभागाचे एकमत होऊन वाहतूक संदर्भातील एका बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व इतर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानुसार पाच कोटींचे नियोजनही ठरले. मात्र, अद्याप कॅमेरे लावण्यासंदर्भात डीपीआर तयार करून निधी मंजूर न झाल्यानंतर कामाला गती मिळालेली नाही. अद्याप तरी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात डीपीआरच तयार झाला नसल्याने हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे.
बॉक्स:
दोन उड्डाणपुलामुळे सहा सिग्नल झाले कमी
पूर्वी शहरात १४ ट्रॅफिक सिग्नल होते. मात्र, पंचवटी ते राजापेठ दरम्यान शहरात तीन उड्डाणपूल झाले. विशेषत: मालवीय चौक ते राजापेठ मंत्री मोटर्सपर्यंत दोन उड्डाणपूल झाल्याने शहरातील १४ पैकी सहा सिग्नल त्यात कमी झाले. त्यामुळे आता फक्त आठच सिग्नल खऱ्या अर्थाने सुरू आहेत. असे सर्वे दरम्यान निदर्शनास आले. आठ ट्रॅफिक सिग्नलवर तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच राहील. त्या व्यतिरिक्त एकूण ११८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शहरावर वॉच राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीसह इतर गुन्हेगारांवरसुद्धा करडी नजर राहणार आहे.
बॉक्स
या ट्रॅफिक सिग्नलवर सीसीटीव्हीचा ‘वॉच‘
शेगाव नाका, पंचवटी चौक, इर्विन चौक, राजकमल चौक, बियाणी चौक, गर्ल्स हॉयस्कूल चौकात कॅमेऱ्यांचा ‘वॉच‘ राहणार आहे. उड्डाणपूल झाल्यामुळे मालवीय चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजापेठजवळील गद्रे चौकातील सिग्नल बंद करण्यात आले होते.
कोट
सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात अद्याप निधी मंजूर नाही. आम्ही शहरात १४८ कॅमेरे लावण्यासंदर्भात सुधारित पत्र दिले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. शहरात कॅमेरे लागणे गरजेचे आहे.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती
कोट
पाच कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र याची फाईल सीसीटीव्ही सहनियंत्रण समितीसमोर जाऊन त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल.
- अमित डेंगरे, सिस्टम मॅनेजर