या खासगी वाहनांना पेट्रोल मिळते तरी कुठून? पेट्रोलपंपधारकांकडून सूट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 01:25 PM2021-05-15T13:25:21+5:302021-05-15T13:25:44+5:30
Amravati news कुठल्याही आपत्कालीन सेवेत न मोडणारेदेखील शहरात चारचाकी वा दुचाकी घेऊन बिनधास्त वावरताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशा खासगी वाहनांना पेट्रोेल देतो तरी कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ९ ते २२ मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनमध्ये दवाखाने व मेडिकल स्टोअर सोडून सर्व आस्थापनांसह सामान्यांसाठी पेट्रोल पंप सर्वस्वी बंद राहतील, असे आदेश आहेत. परंतु काही नागरिक या प्रतिबंधाला न जुमानता रस्त्यावर दिसून येत आहेत. कुठल्याही आपत्कालीन सेवेत न मोडणारेदेखील शहरात चारचाकी वा दुचाकी घेऊन बिनधास्त वावरताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशा खासगी वाहनांना पेट्रोेल देतो तरी कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे. व्यवसाय होण्यासाठी काही पेट्रोलपंपधारक सरसकट सर्वांना पेट्रोल तर देत नसावेत ना, अशी शंकादेखील उपस्थित केली जात आहे.
शनिवार १५ मे रोजी मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकांमध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास जवळपास १५ ते २० मिनिटांच्या कालावधीत या चौकातून शंभरच्यावर दुचाकी, तर ५० च्या वर चारचाकी वाहने ये-जा करताना दिसून आली. उपस्थित पोलिसांनी वाहनधारकांची चौकशी केली असता, कुणाला लग्नपत्रिका वाटपाचे काम, तर कुणी तेरवीला जात असल्याचे सांगितले. एक जण तर मिनिडोरमध्ये चक्क म्हशी घेऊन येताना दिसला. त्याला विचारणा केली असता, सिंभोरा धरणावरून म्हैस घेऊन सारशीकडे चाललो. माझ्या मालकीच्या म्हशी आहेत, असे सांगून त्याने पोलीस कर्मचार्यांशी वाद घातला. कर्मचाऱ्यांनी सर्व काही बंद असताना म्हशीची आवश्यकता होती का, असे विचारले असता एम. एच २७ बी.एक्स २८८१ या मिनिडोअरचा चालक उर्मट बोलून निघून गेला.
एकीकडे दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनला येथील कपडा व्यापारी, इलेक्ट्रॉनिक दुकानदार, हार्डवेअर, स्टेशनरी, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, टीव्ही मेकॅनिक, तथा खासगी कार्यालय बंद ठेवून प्रतिसाद देत आहे. तसेच १ मे ते २२ मे पर्यंत जीवनावश्यक वस्तूंचीसुद्धा दुकाने बंद असल्याने एकीकडे मार्केटमध्ये शुकशुकाट असताना दुसरीकडे काही नागरिकांमध्ये लॉकडाऊनबाबत जागरुकतेऐवजी निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा बहाणा करून या ठिकाणाहून त्या ठिकाणी ये-जा करण्यास व कर्मचाऱ्यांची वाद करण्यास काही लोकांना आनंद मिळत आहे.
पेट्रोलपंपावर नेहमीसारखीच गर्दी
शहरातील एका पेट्रोलपंपावर शनिवारी नेहमीसारखीच गर्दी दिसून आली. ती नक्कीच केवळ आपत्कालीन सेवेत किंवा शासकीय सेवेत काम करणाऱ्यांची नव्हती. अमरावती शहराप्रमाणेच येथे देखील ओळखपत्राशिवाय पेट्रोल देण्यास बंदी घालावी, पोलिसांची सुरक्षा घ्यावी, त्यामुळे अकारण बाहेर पडणाऱ्यांवर चाप बसू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.