होम आयसोलेटेड कोरोना रुग्णांवर नियंत्रण कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:00+5:302021-05-16T04:13:00+5:30
मोर्शी : कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे निधन झालेल्यांची नावे प्रशासनाने जाहीर करणे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गरजेचे ठरत आहे. प्रशासनाने ...
मोर्शी : कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे निधन झालेल्यांची नावे प्रशासनाने जाहीर करणे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गरजेचे ठरत आहे. प्रशासनाने या बाबीचा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. ज्यांना फारशी लक्षणे नाहीत, त्या संक्रमित व्यक्ती होम आयसोलेटेड अर्थात गृह विलगीकरणात राहतात. मात्र, त्यापैकी अनेक जण बरे होण्याआधीच घराबाहेर मुक्तपणे वावरतात. त्यामुळे अशांवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
गतवर्षी कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये धास्ती होती. संसर्गाचा धोका आणि त्याची भीती ओळखून कोरोना रुग्णाचे निदान झाल्यावर त्याचे नाव प्रशासनातर्फे लपविले जात होते. संबंधित रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागू नये, या कारणाने निधन झालेल्या रुग्णाचे नाव याच कारणामुळे प्रकाशित केले जात नव्हते. ही परिस्थिती सध्याही आहे.
गतवर्षी कोरोना संक्रमित रुग्णांस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात होते. रुग्णाच्या निवासस्थानाचा परिसर सील केल्या जात असे. त्यामुळे सामान्य नागरिक त्या परिसरापासून अलिप्त राहत असे. तथापि, यावर्षी कोरोना रुग्ण आढळल्यास त्यास गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. तथापि, परिसर सील केला जात नाही. अशा रुग्णाच्या घराच्या दारावर नगरपालिकातर्फे स्लिप लावली जाते. संबंधित स्लिप घरावर राहील, याची शाश्वती राहत नाही. गृह विलगीकरणातील रुग्ण घरीच राहील, असेही नाही. अनेक रुग्ण सरसकट बाहेर फिरताना आणि लोकांमध्ये मिसळताना, दुकानातून औषध आणताना आढळून येतात. हीच परिस्थिती मृतासंदर्भात पाहावयास मिळते.
कुटुंबातील कोणी व्यक्ती मरण पावली, तर नातेवाईक, निधनाचे कारण न्यूमोनिया, श्वास कमी पडून अटॅक असे सांगितले जाते. बरीच मंडळी कोरोनामुळे निधन झाल्याचे सांगत नाहीत. या दोन्ही कारणांमुळे रुग्णाच्या वा मृताच्या घरी येणारी मंडळी अनभिज्ञ राहत असल्यामुळे सहानुभूती दर्शविण्याकरिता जातात आणि पर्यायाने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक वर्षाच्या सरावाने कोरोना आजार आता सामान्य झाला असून, रुग्णाला वा कुटुंबाला वाळीत टाकले जाण्याची भीती निरर्थक आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हवे
आज प्रत्येक गावात, जवळपास सर्वच मोहल्ल्यात कोरोना रुग्ण निघाल्याच्या किंवा कोरोनाने निधन झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्या गावावात जाऊन तो परिसर सील करण्याची, लोकांना सतर्क करण्याची मागणी नगरसेवक नितीन उमाळे यांनी केली. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना तपासणी झाल्यास अन्य लोकांना माहिती कळू शकणार आहे.