मनीष तसरे
अमरावती : मध्यंतरी सामाजिक न्याय विभागाकडून घरगुती भांडणे थांबविण्यासाठी ‘नॉक द डोअर’ जाहिरात करण्यात आली होती. आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यापुढे जात ‘कॉल द पोलीस’ हा मंत्रा नागरिकांना मिळालाय. तत्काळ व कुठेही मदत हवी असल्यास ११२ या क्रमांकावर काॅल करा. पोलीस विभागाकडून तुम्हाला तत्काळ मदत मिळेल.
अमरावती शहरात आयुक्तालय अंतर्गत दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लोकांना अडचणींच्या ठिकाणी कधीही, कुठलीही मदत हवी असल्यास पोलीस विभागाकडून १४ सप्टेंबरपासून ११२ का क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कॉल केल्यानंतर तत्काळ पोलीस यंत्रणेद्वारा मदत मिळेल. शहर पोलीस आयुक्तालयाला डायल ११२ अंतर्गत १२ चारचाकी वाहने व १० दुचाकी देण्यात आल्या आहेत. दुचाकीवरील बिट मार्शल, दामिनी पथक व चारचाकीमध्ये कार्यरत पोलीस अधिकारी तातडीने लोकेशन घेऊन तातडीने घटनास्थळी जाऊन तक्रारकर्त्याला मदत करेल.
राज्य सरकारने पोलिसांची तत्काळ मदत हवी असल्यास १०० ऐवजी ११२ हा क्रमांक अंमलात आणला आहे. तक्रारकर्त्यांच्या कॉलवरून किरकोळ ते अतिशय गंभीर असे घटनेचे वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार अंमलबजावणीची सुविधा या प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. 'डायल ११२'चे प्राथमिक संपर्क केंद्र मुंबई व द्वितीय संपर्क केंद्र नागपूर आहे. संपर्क केंद्राकडून आलेली माहिती ही नियंत्रण कक्षाला देण्यात येते व तेथू ती महिती संबंधित ठाण्याला देण्यात येते. ही प्रक्रिया काही मिनिटांत होते.
कोणत्या कारणांसाठी मागितली जातेय मदत?
छेडखानी, लुटमार, रस्त्यावरील भांडण, चेर स्नॅचिंग, घरगुती वादविवाद, अपघात या कारणांसाठी घटनास्थळी पोलीस तातडीने पोहचावे व त्यांच्याकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांना असते.
कॉल येताच मिळते लोकेशन
११२ क्रमांकावर काॅल करताच तो कुठून आला, हे संपर्क केद्रांवर समजते. मदत मागणाऱ्या नागरिकांनी कॉल करताच तो दूरध्वनी मुंबई व नागपूर केंद्राशी जोडला जातो. तेथील प्रतिनिधी तक्रारकर्त्यासोबत संवाद साधतो. ही सेवा बहुभाषिक असल्याने यात भाषेची अडचण येत नाही.