अमरावती : सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये ब्रॉसप्रमाणे वाळू मिळावी, यासाठी गतवर्षी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेला गतवर्षी वाहतूकदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने १४ पैकी एकही डेपो सुरु होऊ शकलेला नाही. आता सप्टेबरअखेर पावसाळा संपत असल्याने ऑक्टोबरमध्ये पुन्हा ४४ वाळूघाटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे स्वस्तातील वाळू यंदा तरी मिळणार का, असा सर्वसामान्य नागरिकांचा सवाल आहे.
राज्य शासनाने स्वस्तातील वाळू या धोरणान्वये आठ तालुक्यातील ४४ वाळूघाटामधून निश्चित केलेल्या १४ डेपोत वाळू जमा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. याडेपोमधून ६०० रुपये ब्रासप्रमाणे ऑनलाइन बुकिंग करुन व स्व:ताच्या वाहतूक खर्चाने वाळू नागरिकांनी न्यायची, असे ते धोरण होते. यासाठी केवळ चार ते पाच तालुक्यासाठी निविदा प्राप्त झाल्या. मात्र यामधील वाहतुकीचे दर प्रशासनाला अपेक्षित दरापेक्षा कितीतरी जास्त असल्याने त्या निविदा बाद झाल्या. उर्वरित डेपोसाठी निविदाच प्राप्त न झाल्याने जिल्ह्यात एकही डेपो सूरुच होऊ शकलेला नाही. निविदेला प्रक्रियेला उशिर हेदेखील त्यामागील एक महत्वाचे कारण होते.