अमरावती; जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विकास समितीच्या बैठकीत बुधवारी जिल्ह्यातील अनाथ बालकांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनामुळे जिल्ह्यातील शंभरावर बालके अनाथ झाली असून, त्यापैकी सात जणांनी दोन्ही पालक गमावले आहेत, त्यामुळे त्यांच्या संवर्धन व संगोपनासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई तत्काळ केली जावी, असे निर्देश सभापती पूजा आमले यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या दालनात सभापती आमले यांच्या अध्यक्षतेखाली महिला बालकल्याण समितीची सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एकूण परिस्थिती जाणून घेतली. महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी अनाथ बालकांना याबाबतची माहिती दिली. दोन्ही पालक गमावलेली बालके किती आणि एक पालक गमावलेली बालके किती, याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्याचवेळी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास समितीच्या सभापती पूजा आमले, समितीच्या सदस्य कल्पना चक्रे, भारती गेडाम, नंदिनी थोटे, आशा वानरे, वंदना करूले तसेच महिला बालविकास विभागाची इतर अधिकारी उपस्थित होते.