येरड - चांदूरखेडा रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:44+5:302021-06-21T04:09:44+5:30
फोटो पी १९ येरड चांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड - चांदूरखेडा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, संबंधित विभाग याकडे ...
फोटो पी १९ येरड
चांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड - चांदूरखेडा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्त्वाची असते. असे असतानाही चांदूर रेल्वे तालुक्यातील नागपूर - औरंगाबाद सुपर एक्स्प्रेस हायवेपर्यंत घुईखेडजवळील येरड ते चांदूरखेडा या दोन किमी रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, गिट्टी बाहेर निघाल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतो. रस्त्यावर पावसाचे पाणी साचून जणू तलावाचे स्वरूप प्राप्त होते. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे व साचलेल्या पाण्यातून वाट कशी काढावी, असा प्रश्न येथील नागरिक व वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
येरड - चांदूरखेडा रस्त्याने वाहनांची मोठी वर्दळ असून, त्यामुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्याची दुरवस्था होऊनही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असून, त्यांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सूर जनतेमधून उमटत आहे. रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे आणि खड्ड्यात साचलेले पाणी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, त्यातच पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने हे जीवघेणे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत.
येरड ते चांदूरखेडा हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा चांदूरखेडा येथील नागरिक अमोल वानखडे यांनी दिला आहे. आता हा रस्ता दुरुस्त होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.