तब्बल पाच तासानंतर मिळाला मृतदेह
फोटो पी १५ तायडे फोल्डर
धामणगाव रेल्वे : समृद्धी महामार्गानजीक सुरू असलेल्या कामावरील एका २२ वर्षीय युवकाचा पाणी पिण्यासाठी गेला असता विहिरीत बुडून मृत्यू झाला. दरम्यान विहीर ५० ते ६० फूट खोल असल्याने तब्बल पाच तासानंतर रेस्क्यू टीमला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ही घटना आसेगावनजीक शनिवारी घडली. रोशन सुनील तायडे (२२, रा. तळेगाव दशासर) असे मृत युवकाचे नाव आहे.
रोशन, त्याचे वडील सुनील तायडे व अन्य एक असे तिघेजण समृद्धी महामार्ग नजीकच्या आसेगाव जवळ बाजूच्या साईड पाट्या लावण्याचे काम करत होते. शनिवारी दुपारी दीड वाजता दरम्यान तहान लागल्यामुळे जवळील विहिरीतील पाणी आणण्यासाठी रोशन गेला होता. पाणी काढताना त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडला. रोशनचे वडील सुनील यांनी दत्तापूर पोलिसांना माहिती दिली. लगेच येथील ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. चांदुर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधवदेखील घटनास्थळी पोचले.
ती विहीर खोल असल्याने दोन मोटरपंपद्वारा पाणी उसण्यात आले. मात्र, मृतदेह आढळला नाही. अमरावती येथील आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्री युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी घटनास्थळी चांदूर रेल्वे पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव, दत्तापूरच्या एपीआय प्रियंका चौधरी, रवींद्र सोनवणे, बीट जमादार उईके होते.